बारामती : निरा कालव्याच्या आवर्तनाने दिलासा

बारामती : निरा कालव्याच्या आवर्तनाने दिलासा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील शेतीला वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. वीर धरणात समाधानकारक पाणीसाठा शिल्लक असल्याने निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे बारामती आणि इंदापूर तालुका ऐन उन्हाळ्यात हिरवागार आहे.

बारामती आणि इंदापूर तालुक्यातील छत्रपती, माळेगाव आणि सोमेश्वर या साखर कारखान्यांसह परिसरात ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांनाही या पाण्याचा उपयोग झाला. शिवाय जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. जलसंपदा विभागाने ठिकठिकाणी कालव्याची दुरुस्ती केल्याने पाण्याचा अपव्यय थांबला असून, यातून खालील शेतकर्‍यांपर्यंत पाणी मिळत आहे.

बारामती तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. कालव्याचे कायमस्वरूपी आणि हक्काचे पाणी मिळत असल्याने उसासह तरकारी पिकांचे मोठे उत्पन्न या ठिकाणी घेतले जाते. मुबलक पाणी असल्याने शेतीतील उत्पन्न वाढले असून, शेतकर्‍यांना याचा फायदा होत आहे. पालेभाज्या, फळबागा, ऊस यांच्यासह शेतात नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. दोन्ही तालुक्यांतील शेतकर्‍यांना निरा नदी आणि निरा डावा कालव्याद्वारे शेतीला पाणीपुरवठा होत आहे.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली
डावा कालव्याला पाणी असल्याने विहिरींची पाणीपातळी टिकून राहण्यास मदत झाली आहे. तसेच, छोटे उद्योगधंदे, मत्स्यपालन यांनाही याचा उपयोग होत आहे. फेब्रुवारी ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत कालवा पूर्णक्षमतेने सुरू आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरू होत आहे. बारामती तालुक्यावर अवकाळीचे ढग कायम आहेत. कालवा सुरू असल्याने सध्यातरी शेतीचा प्रश्न निकाली लागला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news