

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कराटेचे वर्ग घेणार्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी असिफ रफिक नदाफ (वय 31, रा. कोंढवा) यास न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व 17 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी हा निकाल दिला.
हा प्रकार ऑगस्ट 2016 ते जानेवारी 2017 दरम्यान घडला. पीडिता ही आरोपीच्या कोंढवा येथील कराटे क्लासमध्ये शिकत होती. या वेळी असिफ याने तिला 'मला तू खूप आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,' असे सांगितले. यादरम्यान त्याने तिला घरी नेले. त्यानंतर आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले.
यामध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दिली. यादरम्यान तिला बाळही झाले. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांची घरात सारखी भांडणे होत असल्याने मुलगी घाबरलेली असल्याने तिने कराटे शिक्षक त्रास देत असल्याचे घरात कोणाला सांगितले नव्हते. परंतु, ती गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. यामध्ये त्यांनी दोन साक्षीदार तपासले. या वेळी बचाव पक्षाने पीडितेच्या संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तसेच, डीएनए अहवाल निगेटिव्ह असल्याचा दाखला देत बचाव केला. त्यावर पीडितेच्या वतीने अॅड. बोंबटकर यांनी युक्तिवाद करीत पीडिता ही गर्भवती होती. डीएनए अहवाल निगेटिव्ह आला असला तरी पीडितेने साक्ष नोंदविताना सर्व घटनाक्रम सांगितला आहे.
तसेच, पोलिसांसमोर जबाब, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यां समोरील कलम 164 चा जबाब व न्यायालयातील जबाब सुसंगत होता. घटनेच्या वेळी पीडिता अल्पवयीन होती. त्यामुळे तथाकथित संमती ग्राह्य धरता येणार नसल्याचे मत मांडले. न्यायालयाने ते ग्राह्य धरत शिक्षा सुनावली.