

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : धायरी येथे अवैध बांधकामांच्या नावाखाली महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण कारवाई स्थगित करावी आणि 1997 मध्ये महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या गावांच्या धर्तीवर धायरी येथील बांधकामे नियमित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. धायरी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांसह बांधकाम व्यावसायिक, नागरिकांनी या कारवाईचा निषेध केला होता. राष्ट्रसेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे व नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनास निवेदन दिले. पोकळे म्हणाले की, महापालिकेत समावेश होऊन पाच वर्षे होऊनही विकास आराखडा मंजूर करण्यात आला नाही.
गुंठेवारी प्रक्रिया रखडली असताना अधिकार्यांना काही समाजकंटक हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत आहे. बहुतांश भूमिपुत्र व्यावसायिक आहेत. अगोदरच त्यांची परिस्थिती हलाखीची आहे. कारवाईमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.आर्थिक संकट कोसळले आहे. वीस वर्षांपूर्वी शासनाने बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी गुंठेवारी प्रक्रिया राबवली होती. त्यापेक्षा नव्याने सुरू केलेली गुंठेवारी प्रक्रिया जाचक असलेल्याने त्याकडे नागरिक, बांधकाम व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे.
बेकायदेशीर बांधकामांना केवळ बांधकाम व्यावसायिक जबाबदार नाहीत. धायरी परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. मात्र, शासनाने गेल्या चाळीस वर्षांत गावठाण विस्तार केला नाही. निवासी झोन केले नाही. गाव महापालिकेत गेल्यावरही विकासआराखडा मंजूर नाही. अल्प उत्पन्न, मजुरांनी पै पै जमा करून घरे बांधली आहेत. बेकायदेशीर बांधकामांना प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे. सर्वसामान्य कष्टकर्यांची घरे मोठ्या प्रमाणात आहे. सध्याची बांधकामे नियमित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अतिक्रमणांविरोधात करण्यात येत असलेल्या कारवाईचा त्यांनी निषेध करण्यात आला आहे.