बावडा : उजनी धरणातून भीमा नदीतील विसर्गात घट!

गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील भीमा नदीपात्राचे बुधवारी घेतलेले छायाचित्र.
गणेशवाडी (ता. इंदापूर) येथील भीमा नदीपात्राचे बुधवारी घेतलेले छायाचित्र.

बावडा; पुढारी वृत्तसेवा: उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणार्‍या पाण्याचा विसर्ग हा पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्याने बुधवारी (दि. 14) दुपारी 12 वाजता कमी करून 11 हजार 600 क्युसेक एवढा ठेवण्यात आला आहे. उजनी धरणामधील सध्याचा पाणीसाठा 118.54 टीएमसी एवढा असून धरण 102.45 टक्के क्षमतेने भरलेले आहे. उजनी धरणामध्ये बंडगार्डन येथून येणार्‍या पाण्याचा विसर्ग 16 हजार 723 क्युसेक तर दौंड येथून येणार्‍या पाण्याचा विसर्ग हा 24 हजार 701 क्यूसेक एवढा आहे.

त्यामुळे उजनी धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग सकाळी 10 वाजता 31 हजार 600 क्युसेकवरून 21 हजार 600 क्युसेक केला. तर त्यात घट करून दुपारी 12 वाजेपासून 11 हजार 600 क्युसेक एवढा केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती टणूचे पोलिस पाटील शरद जगदाळे-पाटील, प्रदीप बोडके (पिंपरी बुद्रुक), प्रतीक घोगरे (गणेशवाडी) यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी नदीपत्रात 61 हजार 600 क्युसेक एवढा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होता. त्यामुळे नदीकाठची कडवळ, मकवान आदी पिके पाण्याखाली गेली होती, अशी माहिती सुभाष घोगरे (गणेशवाडी) यांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news