

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरीच्या सीमाभिंतीपासून 2 हजार यार्ड म्हणजे 1.82 किलोमीटर अंतराचा रेड झोन लागू झाल्यास पिंपरी-चिंचवड शहरात अतिविकसित भागांना फटका बसणार आहे. परिणामी, त्या भागांतील रहिवाशी धास्तावले आहेत. संरक्षण विभाग व ऑर्डनन्स फॅक्टरी व्यवस्थापनाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास फॅक्टरीच्या सीमाभिंतीपासून 1.82 किलोमीटर परिघात रेडझोन जाहीर करून बांधकामांना अटकाव करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासंदर्भात 'पुढारी'ने सर्वात प्रथम सोमवारी (दि.26) 'रावेत, मामुर्डी, किवळे, प्राधिकरण रेड झोनमध्ये ?' असे ठळक वृत्त प्रसिद्ध केले होते. 'खरंच रावेत, मामुर्डी, किवळे, प्राधिकरण रेड झोनमध्ये जाणार ?; धास्तावलेल्या नागरिकांची महापालिका अधिकाऱ्यांकडे फोनवरून विचारणा', असे वृत्त मंगळवारी (दि.27) प्रसिद्ध केले. यासंदर्भात शहरात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात 1.82 किलोमीटर परिघात रेडझोन हद्द जाहीर केल्यास शहरातील अनेक भागांना फटका बसू शकतो. रावेतमधील रावेत-औंध बीआरटी मार्गावरील मुकाई चौक ते संत तुकाराम महाराज पूल (बॉस्केट ब्रिज), रावेत गावठाण व प्राधिकरणातील अनेक सेक्टर, निगडी व आकुर्डी प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक 22 ते 27 अ, निगडीतील दुर्गादेवी टेकडी, तळवडे येथील सहयोगनर, त्रिवेणीनगर, किवळेतील विजयनगर, मामुर्डीतील साईननगर, संपूर्ण देहूरोड, देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरील पोलिस ठाणे चौक ते सेंटोसा रिसॉर्ट, पुणे-मुंबई जुना महामार्गाजवळील घोरावडेश्वर डोंगरापासून निगडी पीएमपीएल बस स्थानक या परिसर रेड झोनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये धास्तीचे वातावरण असून, संताप व्यक्त केला जात आहे.