भोरमध्ये एकाही परप्रांतियाची नोंद नाही

भोरमध्ये एकाही परप्रांतियाची नोंद नाही
Published on
Updated on

भोर(पुणे) : भोर शहरासह ग्रामीण भागात बांधकाम क्षेत्रात, बेकरी उद्योगात, हॉटेल व्यावसायिक, भंगार गोळा करण्याच्या ठिकाणी अनेक परप्रांतियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु यापैकी एकाचीही नोंद भोर पोलिसांच्या दप्तरी नसल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात उघड झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश शिंदे यांनी याबाबत अर्ज केला होता. शहरात अनेक परप्रांतीय कुटुंबासह राहून उदरनिर्वाह करत आहेत. तसेच काही जण चार-पाच जण एकत्रितपणे राहतात. सर्व गल्लीबोळांमध्ये त्यांचे वास्तव्य दिसून येत आहेत. परंतु ज्या ठिकाणी राहतात त्याच घरमालकांनी भोर पोलिस ठाण्याकडे कोणत्याच प्रकारची नोंद केलेली नाही.

तसेच अनेक ठेकेदारांकडे बांधकाम करण्यासाठी परप्रांतियांची संख्या सर्वात जास्त आहे, यांचीही नोंद भोर पोलिसांकडे मिळून येत नाही. ठेकेदार हे परप्रांतीय कामगारांचा विमा वाचविण्यासाठी नोंद करत नाहीत. बेकरी व हॉटेल व्यावसायिकांकडे सर्रास परप्रांतीय कामास आहेत, त्यांनीदेखील यांची नोंद केलेली दिसून येत नाही.

याशिवाय शहरी व ग्रामीण भागातून परप्रांतीय दिवसभर मोठ्या प्रमाणात भंगार गोळा करत असतात. यामुळे अनेक ठिकाणी लहान-मोठे चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा या परप्रांतियांमध्ये वाद होतात. त्यातून गुन्हे घडतात. याला कोण जबाबदार? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

पोलिसांचे उत्तर 'निरंक'

भाडेतत्त्वावर असलेल्या परप्रांतियांची नोंद शासनाकडे नसल्याने घरमालक वाढीव कर बुडवत असल्याचे दिसून येते. अनेक परप्रांतियांकडे ओळखपत्रे नाहीत. शहरात परप्रांतियांची संख्या किती असल्याचे माहितीच्या अधिकार्‍यात निरंक म्हणून भोर पोलिसांनी उत्तर दिले आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते शिंदे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news