पुणे : डोळ्यांच्या औषधांची परस्पर विक्री; औषध विक्रेता संघटनेचा आरोप

पुणे : डोळ्यांच्या औषधांची परस्पर विक्री; औषध विक्रेता संघटनेचा आरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात पसरत असलेल्या 'आय फ्लू'च्या पार्श्वभूमीवर औषधविक्रेत्यांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय रुग्णांना कोणतीही औषधे देऊ नयेत, असे आवाहन नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेने केले होते. याच संघटनेचे सदस्य डॉक्टर औषधांचा साठा करून परस्पर रुग्णांना देत असल्याचा आरोप पुणे जिल्हा औषध विक्रेता संघटनेने केला आहे. सध्या पुण्यासह राज्याच्या इतर भागांत डोळे येण्याची साथ सुरू आहे. बरेच रुग्ण मेडिकलच्या दुकानातून आय ड्रॉप तसेच इतर औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खरेदी करतात.

औषधांचा अनियंत्रित वापर केल्यामुळे काचबिंदू व मोतीबिंदूसारखे गंभीर आजार होतात. त्यामुळे डॉक्टरांच्या वैध प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधे देऊ नयेत, असे संघटनेने नमूद केले होते. मात्र, संघटनेतीलच डॉक्टर दवाखान्याशी संलग्न फार्मसी नसताना रुग्णांना स्वत:कडील औषधे देत असल्याने केमिस्ट असोसिएशनचे लक्ष वेधले आहे.

फार्मसीस्ट नसताना डॉक्टरांनी औषधांचा साठा करून रुग्णांना परस्पर औषधे देणे, हे औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 मधील 'शेड्यूल के'अंतर्गत दिलेल्या सवलतीचे उल्लंघन आहे. अशी औषध विक्री अवैध मानली जाते. यामध्ये जीएसटी कायद्याचे उल्लंघन होत असल्याने त्याअंतर्गत कारवाई होऊ शकते. त्यामुळे पुणे ऑप्थॉलमॉलॉजिकल सोसायटीने याबाबत गांभीर्याने विचार करावा.

– संदीप पारख, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट

औषध विक्रेत्या संघटनेतर्फे अधोरेखित करण्यात आलेल्या बाबीची आम्ही गंभीर दखल घेत आहोत. व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.

– डॉ. मंदार परांजपे, अध्यक्ष, पुणे ऑप्थॉलमॉलॉजिकल सोसायटी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news