Solapur highway rasta roko
इंदापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांचे इंदापूर येथील ऐतिहासिक समाधिस्थळ व गढीवर झालेले अतिक्रमण काढण्याबाबत दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हिंगणगाव पाटी (ता. इंदापूर) येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी अनिल देवळेकर, प्रवीण माने, मयूरसिंह पाटील, महेश बोधले, प्रेमकुमार जगताप यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Latest Pune News)
आमदार लांडगे म्हणाले, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी नाव, पत्ते लिहून घेतले जात आहेत. हे चुकीचे असून कोणत्याही कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. इंदापूर शहरातील ऐतिहासिक मालोजीराजे समाधीस्थळ तयार झालेच पाहिजे. कायदा हातात घ्यायची वेळ आली तर सांगून घेऊ. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. कोणीही धर्मकार्याच्या आड आले, दबाव आणला तरी मागे हटायचे नाही, असे आवाहन त्यांनी केले.
देवळेकर म्हणाले, ज्यांना संभाजीराजे कळले त्यांनाच हिंदुत्व कळाले. कुठल्याही गडावर अतिक्रमण खपवून घेणार नाही. शिवरायांच्या आजोबांचे स्मारक असे तयार व्हावे की, त्या ठिकाणी प्रत्येक हिंदूने भेट दिली पाहिजे. सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे. आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखता आले पाहिजे.
या वेळी जोरदार घोषणाबाजी करत तब्बल दोन तासाहून अधिक काळ सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या वेळी तहसीलदार जीवन बनसोडे, मुख्याधिकारी रमेश ढगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी निवेदन स्वीकारले.