

मे महिन्यातच झाले मान्सूनचे आगमन
केवळ 70 टक्के सफाईची कामे पूर्ण
पुणे : पुण्यातील पावसाळापूर्व कामे करण्यासाठी महापालिकेने 7 जूनचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, त्या आधीच मान्सूनचे आगमन झाल्याने पालिकेचे नियोजन विस्कटले आहे. त्यात अनेक कामे ही निकृष्ठ दर्जाची होत असल्याने पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे.
पूर्वमोसमी पावसाने पुण्याची दाणादाण उडाली. शहरात पुढील दोन दिवस रेड अलर्ट तर त्याच्या पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान, पालिकेने पावसाळापूर्व कामे करण्यास एप्रिल महिन्यात सुरुवात केली होती. या साठी निविदा देखील काढल्या होत्या. त्यानुसार शहरातील आंबिल ओढा, नागझरी नाला, भैरोबा नाल्यासह अन्य नाल्यांची सफाई सुरू करण्यात आली. ही नाले सफाई करण्यासही 7 जूनचे उद्दिष्ट ठेवले होते. मे महिन्यात 70 टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा अधिकार्यांनी केला आहे. मात्र, पावसामुळे नाले सफाईचे नियोजन बारगळले आहे. पावसात नालेसफाईचे थातुरमातुर काम ठेकेदारांमार्फत सुरू असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ठेकेदार त्यांचा खर्च वाचवून नफा कमवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेत.
पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहून जाताना अडथळा निर्माण होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये, यासाठी महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. हे काम एप्रिल महिन्यात सुरू केले होते. हे काम 7 जूनपूर्वी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे या कामात आता अडथळे येऊ लागले आहेत.