रांजणीची केळी निघाली इराणला ; प्रतिकिलो 21 रुपयांचा दर

रांजणीची केळी निघाली इराणला ; प्रतिकिलो 21 रुपयांचा दर

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  रांजणी (ता. आंबेगाव) येथील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन पारंपरिक कांदा, बटाटा या पिकांबरोबरच आता केळीचे यशस्वी पीक घेतले आहे. शेतकर्‍यांनी पिकविलेली केळी विक्रीसाठी इराणला रवाना झाली आहेत. पहिल्या कापणीला 21 रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. हे दर टिकून राहिल्यास प्रतिएकर खर्च वजा जाता 5 लाख 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा या शेतकर्‍यांना आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये गेल्या 30 ते 35 वर्षांपासून केळी पिकाची लागवड केली जाते. सुरुवातीला हुंडेकरीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना केळीच्या कंदाचे वाटप करून लागवडी व्हायच्या. कालांतराने कंदाची जागा टिश्यू कल्चर केळी रोपांनी घेतली.

परंतु, लागवडीच्या पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन व घडांची निगा, या गोष्टी मात्र पारंपरिक पद्धतीनेच केल्या जायच्या. इतर ठिकाणाहून दररोज शेकडो कंटेनर केळीची निर्यात होत असताना या तालुक्यातील शेतकरी मात्र स्थानिक बाजारपेठेतच केळी विक्रीसाठी पाठवायचे. केळी निर्यातीला असलेली प्रचंड मागणी व भविष्यातील संधी ओळखून रांजणी परिसरातील शेतकरी निवृत्ती निकम, सोमनाथ सोनवणे, श्याम भोर, सतीश वाघ, पांडुरंग निकम, मधुसूदन भोर, रवींद्र थोरात आदींनी केळीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.

कारफाटा येथील महेंद्र भोर यांच्या पुढाकाराने 30 ते 35 शेतकर्‍यांनी एकत्र येत गट स्थापन केला . शेतीच्या माध्यमातून केळी लागवडीपूर्वी कंदर, टेंभुर्णी व इंदापूर भागातील केळी उत्पादक शेतकर्‍यांच्या भेटी घेऊन बागांची पाहणी केली. तसेच विविध केळी निर्यात केंद्र व कोल्ड स्टोअरेजची पाहणी करून निर्यातीची प्रक्रिया समजून घेतली. जानेवारी महिन्यात सुमारे 50 एकर क्षेत्रात जैन केळी रोपांची लागवड केली. प्रत्येक बागेला डबल ठिबक सिंचन नळी टाकून त्याद्वारे पाणी व खत व्यवस्थापन केले. जुलैमध्ये घड बाहेर पडल्यानंतर घड व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये बड इंजेक्शन, फुले काढणे, फण्या कमी करणे व रस शोषणार्‍या किडीच्या प्रादुर्भावापासून केळीला वाचविण्यासाठी आवश्यक फवारण्या केल्या. 10 महिन्यांनंतर आता केळी कापणीला सुरुवात झाली असून, पहिल्याच प्रयत्नात केळी इराण देशात निर्यात केली.

शेतकर्‍यांना मोठी संधी
जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील जमिनी व हवामान हे केळी पिकाला पोषक आहे. 20 वर्षांपासून या भागातून केळीची निर्यात व्हावी, हा प्रयत्न होता. तो रांजणीतील शेतकर्‍यांनी यशस्वी करून दाखविला. निर्यातीच्या दृष्टिकोनातून केळी पिकाचे व्यवस्थापन केल्यास भविष्यात फार मोठी संधी या भागातील शेतकर्‍यांना आहे.
तुषार जाधव, केळी पीकतज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news