पिंपरी : धुळवडी दिवशी रंगपंचमी साजरी

पिंपरी : धुळवडी दिवशी रंगपंचमी साजरी
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात अनेकांनी मंगळवारी (दि. 7) धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली. सकाळपासूनच तरुण-तरुणी विविध रंगांची उधळण करत संगीताच्या तालावर थिरकत असल्याचे चित्र दिसून आले. होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी धूलिवंदन साजरी केली जाते. होळीची राख व चिखल एकमेकांना लावण्याची प्रथा आहे; परंतु सध्या शहरात उत्तर भारतीयांप्रमाणे धुळवडीदिवशी रंग खेळला जातो. धूलिवंदनाच्या दिवशी फक्त तरुणच नाही तर अबाल वृद्धांचाही उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला.

शहरात महाविद्यालयीन परिसरात तसेच मोकळ्या जागेत तरूण-तरूणी एकमेकांना रंग लावताना दिसून येत होते. तर शहरातील बर्‍याच सोसायट्यांमध्ये महिलांसाठी व विशेष करून जेष्ठ नागरिकांसाठी वेगळेच नियोजन करून गीत- संगीताची सोय केल्याने त्यांना धुळवडीचा मनमुराद आनंद घेता आला. सकाळपासूनच बालचमी रंगबेरंगी रंग पिचकार्‍यांत भरून मित्रांवर रंग उडविण्यात मश्गुल झाला होता. सुटी असल्यामुळे नोकरदार, विद्यार्थी, विद्यार्थिनींसह व्यापारी वर्गानेही आपली दुकाने बंद करून रंगांचा आनंद लुटला. तसेच, काही सोसायट्यांमध्ये देखील पार्किंगच्या जागी रस्त्यावर स्पीकर गाणी लावून रंग खेळण्याचा आनंद घेत होते. यंदा शहरात पाणीटंचाई होऊ नये व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरडे रंग खेळण्याचे आवाहन केले होते. यामुळे बहुतांश ठिकाणी कोरड्या रंगांचीच अधिक उधळण केली गेली.

आज सकाळपासूनच छोट्या मुलांच्या टोळ्या आणि तरुण-तरुणींचे बाईकवरून चेहरे रंगविलेले ग्रुप गल्लीतून, रस्त्यातून एकमेंकांवर दबा धरून बसले होते. प्रत्येकाच्या घरी जाऊन रंग खेळला जात होता.

ज्येष्ठ थिरकले
गुलालासोबत कोरड्या रंगाची मुक्तपणे उधळण करत आणि गीत-संगीताच्या तालावर साईपर्ल सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी धुळवडीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली. या वेळी श्रीकांत माने, निकेश कुमार, मेघानी आठवले, अरविंद मानेंसह जेष्ठ उपस्थित होते.

शहरातील संघटनांनी केले खडकवासला जलाशयाचे रक्षण
धुळवडीच्या दिवशी रंग खेळून आल्यानंतर अनेक नागरिक खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी उतरू नये म्हणून जलाशयाभौवती मानवी साखळी करयात आली होती. यामध्ये शहरातील हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ व समविचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पराग गोखले यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news