उपकंत्राटदारांनी लावली गावविकासाची वाट

उपकंत्राटदारांनी लावली गावविकासाची वाट
Published on
Updated on

संदीप बल्लाळ : 

वरकुटे बुद्रुक : 'खेड्याकडे चला' असे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते. त्याचीच री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओढली असून, गावखेड्यात विकासाची गंगा पोहोचवण्याचा अहोरात्र प्रयत्न ते करत आहेत. यातूनच कोट्यवधींचा निधी विकासकामांसाठी सरळ ग्रामपंचायतींच्या खात्यावर जमा करत खेडी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, गावात असलेले गावनेते हे उपकंत्राटदार (सबठेकेदार) झाले आहेत. त्यांनी गावातील विकासाची अक्षरशः वाट लावली आहे.

गावे सुधारावीत यासाठी गावातील नागरिकांना भौतिक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने रस्ते, पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही कुचराई करत नाही. यासाठी कोट्यवधींचा निधी गावोगावी देण्यात येत आहे. हा कोट्यवधींचा निधी पाहता, राजकीय नेत्यांचे डोळे मात्र चमकले. यातूनच मिळणार्‍या कमिशनवरून भांडणारे लबाड गावनेते आता स्वतःच उपकंत्राटदार झाले आहेत. विकासकामात कमिशन मिळावे यासाठी भांडणारे गावनेते विकासकामे स्वतःला मिळावीत यासाठी आता भांडू लागले आहेत.

परिणामी, शासनाच्या कोट्यवधींच्या निधीचा गावोगाव सर्रास गैरवापर होताना दिसत आहे. अधिकचा नफा मिळवण्याच्या धोरणातून गावोगाव गावनेत्यांनी गावासाठी आलेली विकासकामे ग्रामपंचायतीतून टेंडर ऑफलाइन करत स्वतःच्या पदरात पाडून घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात विकासकामांमध्ये जास्त रस न दाखवणारे गावनेते आता मात्र ही कामे मलाच मिळाली पाहिजे, यासाठी जीवाचा आकांत करताना पाहायला मिळत आहेत.

अशा गावनेत्यांनी केलेल्या कामांना कोणत्याही प्रकारची गुणवत्ता नाही, तसेच कोणी तक्रार केली तर राजकीय वरदहस्ताच्या जीवावर किंवा गुंडगिरीच्या बळावर वेळ मारून नेत दर्जाहीन कामे पूर्ण केली जात असल्याचे चित्र सध्या इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावात दिसत आहे. कमिशनसाठी भांडणारे बोके आता विकासकामे मिळवण्यासाठी भांडू लागले आहेत. यातून सुरू झालेल्या जीवघेण्या स्पर्धेतून आगामी काळामध्ये गावाचा विकास तर दूरच, पण यांची डोके फोडाफोडी झाल्याशिवाय राहणार नाही हे चित्र स्पष्ट दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news