पुत्र जन्मला रघुनंदन…आनंदले त्रिभुवन ! उत्साह राम जन्म सोहळ्याचा

पुत्र जन्मला रघुनंदन…आनंदले त्रिभुवन ! उत्साह राम जन्म सोहळ्याचा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सनई-चौघड्याचे मंजुळ स्वर…फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाईने उजळलेली मंदिरे….दुपारी पारंपरिक पद्धतीने झालेला श्री राम जन्मसोहळा…भाविकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी…धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…महाप्रसादाचा भक्तांनी घेतलेला लाभ अन् सायंकाळी वाजत-गाजत निघालेल्या मिरवणुका…अशा भक्तिपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि.30) श्री रामनवमी साजरी करण्यात आली. मंदिरांमध्ये 'जय जय श्रीराम'चा जयघोष दुमदुमला अन् भक्तांनी फुलांची उधळण करीत श्री राम जन्मसोहळा अनुभवला.

मंदिरांमध्ये श्री रामजन्माचे कीर्तन, अभिषेक, महाआरतीसह दुपारी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात आणि रामनामाचा नामघोष करत जन्मसोहळा साजरा झाला. यानिमित्ताने भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्याने आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम…असे विविध कार्यक्रम आयोजिले होते. सायंकाळनंतर मंदिरांसह संस्था-संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. घराघरांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली.

सदाशिव पेठेतील रहाळकर श्री राम मंदिरातही वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजिले होते. दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती. तर सदाशिव पेठेतील सदावर्ते राम मंदिराचे सुनील सदावर्ते म्हणाले, पहाटे काकड आरती झाली. रामरक्षा पठण, विष्णू सहस्रनाम पठण, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि श्री रामजन्माचे कीर्तन मंदिरात झाले. तर दुपारी साडेबारा वाजता जन्मसोहळा झाला. भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला. टिळक चौकातील श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरात श्री रामजन्म सोहळा साजरा करण्यात आला. परंपरेनुसार श्री रामजन्मानंतर सायंकाळी मंदिरातून दिंडी निघाली आणि तुळशीबागेतील श्री राम मंदिरास भेट देऊन पुन्हा मंदिरात आल्यावर महाआरती झाली.

श्री रामनामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्री राम मंदिर निनादले. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी मंदिराच्या सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा एकच नामघोष झाला. श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने श्रीराम जन्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. उद्धव जावडेकर यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले आदी उपस्थित होते. मंदिरात सकाळी पवमान अभिषेकाने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंदिराच्या परिसरात श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली.

भारतीय विद्या भवनतर्फे कीर्तन संवाद
'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाउंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत श्री रामनवमीनिमित्त 'कीर्तन संवाद' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मधुश्री शेंडे आणि अवनी परांजपे या बाल कीर्तनकारांनी कीर्तन संवाद सादर केला. अंजली कर्‍हाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात आशुतोष परांजपे (संवादिनी), केदार तळणीकर(तबला) यांनी साथसंगत केली. 'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news