

खेड: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले असुन नगरपरिषदेकडून सोमवारी ( दि १८ ) शहरातील दहा प्रभागांची प्रारूप रचना प्रसिध्द करण्यात आली. या दहा प्रभागातून २१ नगरसेवक निवडून जाणार आहेत.
त्यातील समतानगर, माळीमळा परिसरातील प्रभाग क्रमांक ७ मधुन ३ आणि इतर प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेवर ३१ ऑगस्ट पर्यंत नागरिक, मतदारांना हरकती, सुचना नोंदविता येणार आहेत. अशी माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. (Latest Pune News)
सन २०१४- १५ मध्ये राजगुरुनगरला नगरपरिषद अस्तित्वात आली.पहिली निवडणुक झाली.मात्र मुदत संपून जवळपास तेवढाच कालावधी गेला तरी निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. प्रशासकीय अधिकारी नेमणुक होऊन कामकाज सुरू राहिले. मात्र ठोस निर्णय झाले नाही.धोरणात्मक कामांवर अमल झाला नाही.
शहरात पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले.मात्र अद्यापही शुध्द पाणी पुरवठा होत नाही.रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन होत नाही.एकुणच पहिल्या नगरसेवक आणि त्यानंतरच्या प्रशासकीय कामकाजावर शहरवासीयांची प्रचंड नाराजी आहे. यावरून अनेक लक्षणीय आंदोलनं शहरात झाली. म्हणुनच नागरिक निवडणुकीची वाट पहात असल्याचे चित्र आहे.येणाऱ्या निवडणुकीतून ही नाराजी समोर येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचा सर्वसाधारण परिसर आणि मतदार संख्या पुढीलप्रमाणे -
प्रभाग क्रमांक १ (२९२३) - थिगळेस्थळ, पांडुरंग नगर. प्रभाग क्रमांक २ (२५६२) - पडळावाडी. प्रभाग क्रमांक ३(२७९०) - चव्हाण मळा, जुना मोटार स्टँड. प्रभाग क्रमांक ४(२६०७) - स्वामी समर्थ कॉलनी, टेल्को कॉलनी नंबर १. प्रभाग क्रमांक ५(२५०२)- टेल्को कॉलनी नंबर २ आणि ३. प्रभाग क्रमांक ६( २४६७)- समृद्धीनगर, वाळुंज स्थळ. प्रभाग क्रमांक ७(४४१८) - समतानगर, माळीमळा. प्रभाग क्रमांक ८(३०७७) - राजगुरु वाडा, ब्राह्मण आळी. प्रभाग क्रमांक ९(२५३७) - बाजारपेठ , आझाद चौक. प्रभाग क्रमांक १०(२७००) गढई मैदान परिसर.
नगराध्यक्ष पद लोकनियुक्त असणार की नाही. याबाबत आम्हाला निवडणुक प्रशासनाकडून कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडला जाणार की थेट लोकनियुक्त निवड होणार याबाबत सांगता येणार नाही.
- अंबादास गरकळ, मुख्याधिकारी - राजगुरुनगर नगरपरिषद