राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : यात्रा भरवायला विरोध असताना नियोजनाच्या बैठका का घेतल्या अशी विचारणा करीत येणवे खुर्द, ता. खेड येथील उपसरपंच अनिल काळूराम आतकर, वय ४० वर्षे याच्यावर गावातील दोघांनी इतर तीन जणांच्या मदतीने कोयत्याने जिवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सध्या गावोगावी यात्रा जत्रांचा हंगाम सुरु आहे. या यात्रांमध्ये मतभेद होण्याचे प्रमाण वाढले असुन येणवेच्या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
रामदास दिलीप जाधव, योगेश दिलीप जाधव , किरण सुरेश जाधव सर्व मुळ राहणार येणवे खुर्द, तर नोकरी व्यवसाय निमित्त सध्या राहणार बाहेरगावी आणि दोन अनोळखी मित्रांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येणवे गावची यात्रा दिनांक १४ रोजी आहे. या यात्रेवरून गावात मतभेद आहेत. हल्लेखोरांचा यात्रेला विरोध होता. तर माजी सरपंच काळूराम आतकर यांचा मुलगा व उपसरपंच अनिल याने यात्रेसाठी ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या होत्या.
याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी गुरुवारी (दि ९) रोजी जखमी अनिल व त्याचा मित्र गावालगत असलेल्या चिखलगावच्या चौकात उभे असताना चाराचाकित येऊन हल्ला केला. लोखंडी घन, कोयत्याने जिवघेणा हल्ला केला. तसेच पिस्तुल दाखवुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तक्रारीत म्हटले आहे. जखमी अनिल याच्यावर राजगुरुनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा