

राजगुरुनगर : "लग्नाला जायचे आहे कपडे लवकर इस्त्री करून द्या" या कारणावरून झालेल्या भांडणात ग्राहकाला बेदम मारहाण करणाऱ्या दोघांना ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सुनावली. तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू वसंतराव फुलावरे अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीचे वडील वसंतराव फुलावरे यांची आरोपातून मुक्तता करण्यात आली.
या खटल्याची माहिती अशी, २० एप्रिल २०१३ रोजी चाकण शहरातील माणिक चौकात हार्दिक भालचंद्र पिंगळे हा वसंतराव फुलावरे यांच्या दुकानात दुपारी बाराच्या सुमारास कपड्याला इस्त्री करण्यासाठी गेला होता. त्यावेळी हार्दिक पिंगळे, लवकर इस्त्री करून द्या असे म्हणाला. त्याचा वसंतराव फुलावरे यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले. या वेळी वसंतराव फुलावरे यांची मुले तेजस वसंतराव फुलावरे,
सचिन उर्फ पप्पू फुलावरे (सर्व रा. चाकण, ता. खेड) यांनी हार्दिक पिंगळे याला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यात हार्दिक जखमी झाले. त्यांनी याबाबत चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. चाकण पोलिसांनी दोन्ही मुलांसह वसंतराव फुलावरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक सुशील कदम यांनी केला होता.
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश सय्यद यांच्या कोर्टात सुरू होता. सरकारपक्षाच्या वतीने सरकारी वकील मिलिंद पांडकर यांनी ७ जणांची साक्ष घेतली. जखमी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. फिर्यादीतर्फे ॲड. रजनी देशपांडे यांनी काम पाहिले. न्यायाधीश सय्यद यांनी तेजस वसंतराव फुलावरे, सचिन उर्फ पप्पू फुलावरे यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. वसंतराव फुलावरे यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून पोलिस शिपाई पूजा काळे, उषा होले यांनी काम पाहिले.