राजगड-सिंहगड परिसराला पावसाची प्रतीक्षा; भात रोपांची वाढ खुंटली, शेतकरी चिंताग्रस्त

राजगड-सिंहगड परिसराला पावसाची प्रतीक्षा; भात रोपांची वाढ खुंटली, शेतकरी चिंताग्रस्त

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीच्या राजगड (वेल्हे) तालुक्यातील तोरणा, राजगड, पानशेत भागासह पश्चिम हवेली तालुक्यातील सिंहगड भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत; तर दुसरीकडे अपुर्‍या पावसामुळे भात रोपांची वाढ खुंटली आहे. तसेच, कोरडवाहू क्षेत्रात बियाण्यांची उगवणही झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

राजगड तालुक्यात खरीप पिकांच्या लागवडीखाली 5 हजार 200 हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी सर्वांत अधिक 4 हजार हेक्टर क्षेत्र भात पिकांच्या लागवडीखाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात धुळवाफेवर भात रोपांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे. जवळपास 80 टक्के रोपांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यंदा पेरभाताचे क्षेत्र वाढले आहे.

अपुर्‍या पावसामुळे जमिनीत पुरेसी ओल नसल्याने कोरडवाहू क्षेत्रातील भात रोपांची तसेच पेरभात (एसआरटी) बियाण्यांच्या उगवणीवर परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून काही भागांत तुरळक पाऊस पडत आहे, त्यामुळे पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे, असे पानशेत विभागाचे मंडल कृषी अधिकारी श्रीधर चिंचकर यांनी सांगितले.

मान्सूनचा पहिला आठवडा कोरडा गेला आहे. त्यामुळे भात रोपांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रोपांची चांगली वाढ झाली. मात्र, काही ठिकाणी कमी पावसामुळे वाढ खुंटल्याचे वेल्हे बुद्रुक येथील शेतकरी विकास गायखे यांनी सांगितले.

रोपांची वाढ होण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. बुधवारी (दि. 19) सकाळपासून पानशेत, सिंहगड, राजगड (वेल्हे) भागात पावसाळी वातारण निर्माण झाले होते. काही भागांत तुरळक, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला, त्यामुळे शेतकर्‍यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे खानापूर येथील शेतकरी मुरलीधर जावळकर यांनी सांगितले.

हवेलीतही उगवणीवर परिणाम

हवेली तालुक्यात भात पिकांच्या लागवडीखाली 3 हजार 300 हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी सर्वांत अधिक क्षेत्र सिंहगड, पश्चिम हवेली भागात आहे. अपुर्‍या पावसामुळे हवेलीतील खानापूर, मणेरवाडी, डोणजे, गोर्‍हे, खामगाव मावळ, मोगरवाडी, मांडवी भागात भात रोपांच्या उगवणीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी 50 ते 60 टक्के बियाण्यांची उगवण झाली आहे. माळरानावरील रोपे पिवळी पडली आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news