

वेल्हे: राजगड तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी राजगड तालुका तहसील कार्यालयाने धडक कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत गौणखनिज वाहतूक करणाऱ्या एकूण 6 वाहनांवर कारवाई करीत संबंधित वाहनमालकांकडून 12 लाख 86 हजार 182 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
तहसील कार्यालय राजगड व वरिष्ठ कार्यालयाकडून नियमानुसार गौणखनिज उत्खनन, वाहतूक तसेच सपाटीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, काही ठिकाणी परवानगीशिवाय डोंगरांची लचकेतोड करीत मुरूम, दगड, मातीचे अवैध उत्खनन व वाहतूक सर्रास सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. विशेषतः पानशेत धरण, राजगडच्या डोंगराळ भागात जेसीबी यंत्राच्या साहाय्याने अनधिकृत उत्खनन करून शासकीय महसुलाचे नुकसान केले जात होते.
यासंदर्भात तहसीलदार निवास ढाणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, गौणखनिज उत्खनन, वाहतूक व सपाटीकरणासाठी नियमानुसार परवानगी घेऊनच कामकाज करावे. अनधिकृत उत्खनन व वाहतूक आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. पावसाळ्यापूर्वी अवैध उत्खननामुळे दरडी कोसळण्याचा धोकाही वाढतो, त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.