

पुणे : ‘महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार आणि न्याय मिळणार असेल, तर त्यासाठी मी कोणाचेही पाय धरायला तयार आहे,’ अशा अत्यंत संवेदनशील शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आज (दि. ५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित हजारो तरुणांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ‘मी इथे भाषण करायला नाही, तर तुमच्या रागात सामील व्हायला आलोय,’ अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घातला.
आंदोलक विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर राज ठाकरे म्हणाले, ‘वर्षानुवर्षे अभ्यास करूनही परीक्षा वेळेवर होत नाहीत, निकाल लागत नाहीत आणि लागलेले निकाल रखडतात. ही तुमची वेदना मी अत्यंत जवळून समजू शकतो. परंतु तुमचा हा राग केवळ तात्पुरता रस्त्यावर येण्यापुरता असू नये. हा राग कायम धगधगता राहिला पाहिजे, तरच व्यवस्थेला जाग येईल.’
तरुणांना मोलाचा सल्ला देताना ते पुढे म्हणाले, "विद्यार्थ्यांनी जातीपातीच्या भानगडीत मुळीच पडू नका. राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला जातींमध्ये विभागतील, पण बेरोजगारीला कोणतीही जात नसते. वस्तुस्थिती समजून घ्या, सरकारकडून रोजगाराचे ठोस नियोजन हवे आणि तरुणांना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत."
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर आणि परीक्षा घोटाळ्यांवर भाष्य करताना त्यांनी तीव्र उपरोधिक टोला लगावला. "आज राज्यात काय परिस्थिती आहे? तुमच्याकडे परीक्षेचे पेपर फुटतायत आणि आमच्याकडे जनतेने दिलेली मतं फुटतायत! निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या डोक्यात जो सत्तेचा गैरसमज बसला आहे, तो जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही, तोपर्यंत सामान्यांना आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळणार नाही," असा घणाघात त्यांनी केला.
सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करताना राज ठाकरे म्हणाले, "देशात आणि राज्यात सध्या एकाच बाजूची 'मन की बात' सुरू आहे; जनतेचे ऐकायला कोणालाही वेळ नाही. दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं पोर्ट की दे अदानीला, असा सगळा कारभार सुरू आहे. सर्वसामान्य तरुणांच्या रोजगाराचे काय? त्यांच्या भवितव्याचे काय?" असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
"रोज अभ्यास करून नशिबी फक्त पेपरफुटीच?"
मराठवाडा आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची व्यथा मांडताना राज ठाकरे म्हणाले, "आज माझ्या मराठवाड्यातील शेकडो तरुण-तरुणी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आले आहेत. पोटाला चिमटा काढून हे तरुण रोज रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. पण एवढं कष्ट करूनही त्यांच्या नशिबी काय येतं? तर फक्त 'पेपर फुटला' ही बातमी! हा तरुणांच्या भविष्याशी चाललेला क्रूर खेळ आता थांबलाच पाहिजे."
"मी कडवट बोलतो, पण सत्यच बोलतो"
विद्यार्थ्यांना वास्तवतेची जाणीव करून देताना ते म्हणाले, "माझं बोलणं कदाचित काहींना टोचेल, मी कडवट बोलतो, पण सत्यच बोलतो. तुमचा हा जो संताप आणि राग आहे, तो असाच धगधगता आणि कायम राहणं गरजेचं आहे. न्याय मिळवण्यासाठी स्वाभिमानाने आणि एकत्रितपणे लढल्याशिवाय व्यवस्थेला जाग येणार नाही."
जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.