Pune News : पावसाळी वाहिनीचा खर्च पाण्यात!

Pune News : पावसाळी वाहिनीचा खर्च पाण्यात!

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : घोरपडी परिसरातील भीमनगर ते जहांगीरनगर या मुख्य रस्त्यावर महापालिकेने काही वर्षांपूर्वी पावसाळी वाहिनी टाकली होती. मात्र, ही वाहिनी पुढे कुठेच जोडली गेली नसल्याने त्यामध्ये राडारोडा साचून ती ब्लॉक झाली. त्यामुळे पालिकेचा निधी पाण्यात गेला आहे. वर्दळीच्या या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहत आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने या रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकली. वास्तविक, ही वाहिनी टाकल्यावर त्यामधून पाणी वाहून जाण्यासाठी ही वाहिनी पुढे 'कनेक्ट' करणे आवश्यक होते. मात्र, तसे न केल्याने या वाहिनीच्या चेंबरमधून पावसाच्या पाण्याबरोबर दगड व माती साचून राहिली व एका पावसाळ्यातच ही वाहिनी पूर्ण तुंबली आहे.

याविषयी पालिकेकडे चौकशी केली असता येथील पावसाळी वाहिनी अशी अपूर्णावस्थेत का व कुणी ठेवली, याची माहिती घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच, आता येथील ब्लॉक झालेली पावसाळी वाहिनी काढून पुन्हा नव्याने टाकून ती पुढे कनेक्ट करावी लागेल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

कुठे गेला निधी?
प्रभाग 21 मध्ये गेल्या पाच-सहा वर्षांत सुमारे 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आला आहे. मात्र, तरीही अशी अत्यावश्यक कामे तर झालीच नाहीत. पण, अपूर्ण कामेही पूर्ण केली गेली नाहीत, असे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा आलेला निधी गेला कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

येथील पावसाळी वाहिनीची पाहणी केली आहे. ही वाहिनी पुढे कुठेच कनेक्ट नसल्याने ती ब्लॉक झाली आहे. येथे पुन्हा नव्याने पावसाळी वाहिनी टाकावी लागेल.
                                                    – देवर्षी देवकर, ड्रेनेज विभाग, पुणे मनपा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news