

Rainfall decreases in Maharashtra
पुणे: राज्यातील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र (विशेषत: घाटमाथा), मराठवाडा आणि विदर्भाच्या सर्वच भागांत गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे राज्यातील बहुतांश नद्यांना महापूर आले.
या महापुरांमुळे दाणादाण उडाली. आता मात्र मुसळधार पडणारा पाऊस हळूहळू कमी होऊ लागला असून, शनिवारपर्यंत ठराविक भाग वगळता पूर्णपणे पाऊस थांबणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. (Latest Pune News)
राज्यातील मुंबईसह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात त्यातही घाटमाथ्यावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जबरदस्त हजेरी लावली. या पावसाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की, जवळजवळ सर्वच नद्यांना पूर नव्हे, तर महापूर आला होता. त्यातही मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा
यासह मराठवाड्यात पावसाने हाहाकार उडवून दिला. त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड, मुखेडसह सर्वच भागांतील नद्यांना महापूर आले. त्यामुळे पिकांची नासाडी तर झालीच, त्यापेक्षा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशाप्रकारे हाहाकार उडवून देणारा मुसळधार पाऊस आता कमी होऊ लागला आहे. गुरुवार, शुक्रवारी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. मात्र, शनिवारपासून (दि. 23) पाऊस पूर्णपणे उघडीप देण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणात 26 ऑगस्टपर्यंत बहुतांश तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सोसाट्याच्या वार्यांसह हजेरी लावणार आहे. तर, विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वार्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर थोडासा पाऊस हजेरी लावणार आहे.
...असे आहेत ‘यलो अलर्ट’ (कंसात दिनांक)
मुंबई-21, पालघर-21, रायगड-21 ते 24, रत्नागिरी-21 ते 24, नाशिक घाटमाथा-21, पुणे घाटमाथा-21 (ऑरेंज) नंतर यलो, सातारा घाटमाथा-21, 22, अमरावती-24, भंडारा-23, 24, चंद्रपूर-23, 24, गोंदिया-23, 24, वर्धा-23, 24.