Bhor new ward structure announced
भोर: भोर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. भौगोलिक आणि लोकसंख्येच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या या प्रारूप प्रभागरचनेत 8 ऐवजी 10 प्रभाग असणार आहेत, तर नगरसेवकांची संख्या 17 वरून 20 इतकी वाढली आहे. यामुळे 2 प्रभाग आणि 3 नगरसेवक वाढले आहेत.
नवीन प्रभाग रचनेमुळे काहींना फायदा, तर काहींना तोटा झाला आहे. त्यामुळे इच्छुकांचे लक्ष आता नगराध्यक्षपद आणि नगरसेवक आरक्षणाकडे लागले आहे. (Latest Pune News)
या प्रारूप रचनेवर नागरिकांना 31 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जाहीर केलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार, भोर नगरपरिषदेने प्रारूप प्रभाग रचना तयार केली असून, ती जिल्हाधिकार्यांमार्फत नगरविकास मंत्रालयाकडे सादर करण्यात आली आहे.
पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या रचनेचा तपशील नगरपरिषदेच्या कार्यालयातील नोटीस बोर्डावर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.