धानोरी/वडगाव शेरी : धानोरी, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, खराडी परिसराला मंगळवारी जोरदार पूर्वमोसमी पावसाने झोडपले. रस्त्यांवर इतके पाणी साचले होते की, त्यामध्ये चारचाकी वाहने तरंगताना दिसून आली. ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. पुणे शहरासह उपनगरांतही जोरदार पाऊस झाला. धानोरी परिसराला मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पूर्व मौसमी पावसाने झोडपून काढले. परिसरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते. रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साठल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. धानोरी गावठाणातील दुकाने, घरे आणि सोसायट्यांत पाणी शिरल्याने व्यावसायिक व नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. धानोरी, टिंगरेनगर, विद्यानगर, कलवड परिसरात पावसाने हैदोस घातला. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की, वाहनचालकांना समोरचे दिसनेही अवघड झाले होते. धानोरी गावठाण परिसरातील रस्त्यांवर तीन फुटांहून अधिक पाणी होते. त्यामुळे अनेक ठिकाणी चारचाकी वाहने पाण्यावर तरंगताना दिसत होती. दुकानांमध्ये सुमारे पाच फूट पाणी साठले होते. पाऊस सुरू झाल्यानंतर तासाभरातच धानोरी नाल्याला पूर आला. भैरवनगरचा नाल्याकडील भाग, श्रमिकनगर, विद्यानगर शेवटचा बसस्टॉप आदी परिसरातही रस्त्यांवर दोन ते तीन फूट पाणी साठल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. रटिंगरेनगर व भैरवनगर यांना जोडणार्या पुलावरून पाणी वाहत होते. विश्रांतवाडी-फाईव्ह नाईन रस्त्यावर अनुप बेकरीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
वडगाव शेरी परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पूर्व मोसमी पावसामुळे परिसरातील रस्ते जलमय झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. तसेच काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्याच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. दरम्यान, महापालिका प्रशासनाने नाले सफाई केल्याचा दावा या पावसाने फोल ठरला आहे.या भागातील अरनॉल्ड शाळा, टेम्पो चौक, खराडीतील रिलायन्स मार्ट, तसेच नगर रोड, रामवाडी पोलिस चौकी, रामवाडी पेपल सेमिनरी, शास्त्रीनगर आदी ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
अरनॉल्ड शाळा ते सनसिटीदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नगर रोड, कल्याणीनगर, वडगाव शेरी आणि खराडीतील अंतर्गत रस्त्यावर देखील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र दिसून आले. सोपाननगर, हरिनगर, थिटे वस्ती, आपलं घर, जगदंबा सोसायटी, तसेच वडगाव शेरीतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
येरवडा : येरवडा परिसरात मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या तळघरात पावसाचे पाणी शिरले. प्रशासनाने पावसाळापूर्व नाले सफाई केल्याच्या दावा या पावसामुळे फोल ठरल्याचे चित्र दिसून आले. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे वाहनचालक व नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. रस्त्यांवरील पावसाळी वाहिन्या तुंबल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. प्रशासनाकडून परिसरात नाले, ड्रेनेज व पावसाळी वाहिन्यांची अद्यापही सफाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
धनकवडी : धनकवडी, आंबेगाव पठार, बालाजीनगर, भारती विद्यापीठ परिसरात वादळी वार्यांसह जोरदार पाऊस झाला. धनकवडी परिसरातील राजमुद्रा सोसायटी, तसेच राऊत बाग परिसरातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. तसेच राजमुद्रा सोसायटीत दोन झाडे उन्मळून पडली. यात एक मोटारीचे नुकसान झाले. त्रिमूर्ती चौकाकडे जाणार्या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. परिसरातील नागरिक व वाहनचालकांची या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा