रेल्वेचे 172 व्या वर्षात पदार्पण: जाणून घ्या रेल्वेचा अभूतपूर्व प्रवास

रेल्वेचे 172 व्या वर्षात पदार्पण: जाणून घ्या रेल्वेचा अभूतपूर्व प्रवास
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इंग्रज अधिकार्‍यांनी सुरू केलेली कोळसा ट्रेन ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंतची 'वंदे भारत' ट्रेनची धाव यशस्वीरीत्या पूर्ण करीत रेल्वेने 171 वर्षांचा अभूतपूर्व प्रवास पूर्ण केला आहे. आता रेल्वेने 172 व्या वर्षात पदार्पण केले आहे. लवकरच चीन, जपान या देशांप्रमाणे बुलेट ट्रेनने प्रवास करायला मिळेल, अशी अपेक्षा भारतीय रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
भारतीय रेल्वेने 171 गौरवशाली वर्षे पूर्ण केली.

दि. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी आशियातील आणि भारतातील पहिली ट्रेन बोरी बंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून रवाना झाली. जशी वर्षे उलटली, तशी पहिली ट्रेन चालवणारी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे 1900 मध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीत विलीन झाली आणि तिच्या सीमा उत्तरेला दिल्ली, उत्तर-पूर्वेकडे कानपूर व अलाहाबाद तसेच पूर्वेकडे नागपूर ते दक्षिण-पूर्वेकडील रायचूरपर्यंत विस्तारल्या.

…अन् पहिली विद्युतीकरणावरील रेल्वे धावली

दि. 3 फेब—ुवारी 1925 रोजी बॉम्बे व्हीटी आणि कुर्ला हार्बर यादरम्यान भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सेवेच्या धावण्याने रेल्वे आणि मुंबईच्या उपनगरीय सेवांच्या विद्युतीकरणाची पायाभरणी केली गेली. आज ही रेल्वे मुंबई शहराची जीवनरेखा बनली आहे. मध्य रेल्वेने 100 टक्के विद्युतीकरणाचे लक्ष गाठले आहे. सध्या मध्य रेल्वेकडे पाच उपनगरीय कॉरिडॉर आहेत. 3 डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू 9 डब्यांच्या, 12 डब्यांच्या आणि काही सेवांमध्ये 15 डब्यांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोईस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही मध्य रेल्वेवर सुरू करण्यात आल्या आहेत.

अशी झाली मध्य रेल्वेची स्थापना

दि. 5 नोव्हेंबर 1951 रोजी निजाम संस्थान, सिंधिया संस्थान आणि ढोलपूर संस्थानातील रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे या 5 विभागांसह मध्य रेल्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये 4 हजार 275 मार्ग किमीपेक्षा जास्त अंतरावर पसरली असून, या राज्यातील तब्बल 466 स्थानकांद्वारे मध्यरेल्वे सेवा देते.

मध्य रेल्वे चालवतेय 6 'वंदे भारत' एक्स्प्रेस

एप्रिल 1853 मधील पहिल्या ट्रेनपासून ते भारतातील सर्वांत आधुनिक ट्रेन 'वंदे भारत' एक्स्प्रेसपर्यंत रेल्वेने गेल्या 171 वर्षांमध्ये आपले जाळे यशस्वीरीत्या विस्तृत केले आहे. सध्या मध्य रेल्वे 6 'वंदे भारत' एक्स्प्रेस गाड्या चालवते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जालना, नागपूर-बिलासपूर आणि नागपूर-इंदूर वंदे भारत यांचा समावेश आहे.

काही जुन्या गाड्या धावतात 100 वर्षांनंतरही

अनेक मोठ्या कामगिरीसह मध्य रेल्वे आघाडीवर आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी पुढीलप्रमाणे : पहिली शताब्दी एक्स्प्रेस, पहिली जनशताब्दी एक्स्प्रेस, पहिली तेजस एक्स्प्रेस इ. व पंजाब मेलसारख्या काही जुन्या गाड्या 100 वर्षांनंतरही धावत असल्याने आणि प्रवाशांमध्ये लोकप्रिय असल्याने यामार्फत मध्य रेल्वेने निश्चितच खूप मोठा पल्ला गाठलेला आहे.

माथेरान टॉय ट्रेनलाही 117 वर्षे पूर्ण

नेरळ-माथेरान मिनी रेल्वेनेही 117 गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. या रेल्वेचे बांधकाम 1904 मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाइन अखेरीस 1907 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारी म्हणून पावसाळ्यात ही लाइन बंद राहिली. तथापि, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही चालविण्यासाठी दि. 29 नोव्हेंबर 2012 पासून सुरू करण्यात आली. नेरळ-माथेरान नॅरोगेज मार्गावरील प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास तसेच सेवा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेने या विभागात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news