LokSabha Elections : सोसायट्यांमध्ये देशात पहिले मतदान केंद्रे पुण्यात.. | पुढारी

LokSabha Elections : सोसायट्यांमध्ये देशात पहिले मतदान केंद्रे पुण्यात..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीमध्ये यावर्षी पहिल्यांदाच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असणार आहे. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था अर्थात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पुणे शहरात सुमार 35 सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. सोसायट्यांमध्ये देशात पहिले मतदान केंद्रे हे पुण्यात स्थापन झाले आहे. त्यामुळे पुणे शहरात 35 सोसायट्यांमध्ये ही केंद्रे आहेत.

त्यात खडकवासला भागात सर्वाधिक 15 तर भोर तालुक्यात केवळ पाच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे आहेत. तसेच वडगाव शेरीमध्ये सात, कोथरूडमध्ये आठ सोसायट्यांमध्ये ही मतदान केंद्रे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 82 लाख 92 हजार 951 इतक्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात 43 लाख 28 हजार 954 पुरुष आणि 39 लाख 63 हजार 269 स्त्री तसेच 728 तृतीयपंथींचा समावेश आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुणे जिल्ह्यात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पाच किंवा त्यापेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये विविध सोयी-सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आदी महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, असेही डॉ. दिवसे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button