पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या तीन दिवसांच्या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या पुणे विभागाकडून 30 जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु, पुढील तीन दिवस हे विकेंडचे असणार आहेत. तसेच, उन्हाळी सुट्या संपवून घरी परतणार्यांचीही गर्दी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होण्याची शक्यता आहे.
रेल्वेने शुक्रवारी (दि. 30) मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी (दि. 2 जून) दुपारी 02 वाजेपर्यंत मुंबईतील प्लॅटफॉर्म लांबी वाढवण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पुण्यातून मुंबईसाठी आणि मुंबईतून पुण्यासाठी धावणार्या डेक्कन क्वीन, सिंहगड, प्रगती, डेक्कन, इंटरसिटीसह वंदे भारतसह अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाकडून अतिरिक्त 30 बस सोडण्याचे नियोजन केले आहे. एसटीच्या शिवाजीनगर स्थानकाचे वरिष्ठ आगार व्यवस्थापक ज्ञानेश्वर रणावरे म्हणाले, रेल्वेच्या 36 तासांच्या ब्लॉकच्या नियोजनाबाबत समजले. त्याअनुषंगाने प्रवाशांच्या सोयीसाठी वाकडेवाडी आणि पुणे स्टेशन येथून जादा बस सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे प्लॅटफॉर्म क्रमांक 10/11 ची लांबी वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे 31 मे ते 2 जूनपर्यंत 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळेत प्रवाशांचे हाल होणार आहेत. याकरिता प्रशासनाने अतिरिक्त माफक दरातील वाहन सुविधेची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशनसह अन्य छोट्या-मोठ्या थांब्यांवरून जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रेल्वेच्या मेगा ब्लॉकच्या दरम्यान आणखी बसची आवश्यकता भासल्यास अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील.
– प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक, एसटी, पुणे विभाग
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 36 तासांचा असणार असून, शुक्रवारी रात्री 12 पासून रविवारी दुपारपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.
– रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग
रेल्वेच्या मेगा ब्लॉक संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आहे. पुढील दोन-तीन दिवस पुणे-मुंबईदरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना मदत करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मात्र, प्रवाशांची टप्पा वाहतूक करण्यास आम्हाला परवानगी नाही. एसटी प्रशासनाला बस पुरवण्याची आवश्यकता भासल्यास आमच्याकडील बस माफक दरात उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवली आहे. मात्र, त्याचे पैसे आम्ही घेणार नाही. एसटीने ते घ्यावे आणि नंतर आम्हाला ते एसटीच्या तिकिटाप्रमाणे द्यावेत. एसटीच्या संपाच्या काळात आम्ही प्रशासनाला अशीच मदत केली होती. तशी मदत करण्यास आम्ही तयार आहे. एसटी प्रशासनाने आमच्या संघटनेशी संपर्क साधावा, असे पुणे बस ओनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष किरण देसाई यांनी दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
हेही वाचा