

पुणे: महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ सुशोभीकरण प्रकल्पातील भूसंपादनाचा असलेला मोठा अडथळा आता दूर झाला आहे. मुंढवा येथील महिला व बालकल्याण विभाग, संगमवाडीतील संरक्षण खाते आणि कोरेगाव पार्क येथील वन विभाग यांच्या एकूण 22.26 हेक्टर जागांचे भूसंपादन करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. विशेष म्हणजे, संरक्षण खात्यानेही परवानगी दिल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीकाठाच्या 44.4 किलोमीटर परिसराचा विकास करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मालकीच्या जागा या प्रकल्पासाठी आवश्यक असून, त्यांचे भूसंपादन करण्यासाठी महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. (Latest Pune News)
गुरुवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, प्रकल्प विभागप्रमुख दिनकर गोजारे आणि कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे उपस्थित होते.
‘संगमवाडी भागातील संरक्षण खात्याची सुमारे 7 हेक्टर जागा या प्रकल्पासाठी महत्त्वाची असून, तेथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या जागेबदल्यात महापालिका संरक्षण विभागासाठी 32 कोटींची कामे करून देणार असून, त्याबाबतचा सामंजस्य करार पुढील आठवड्यात होणार आहे.
दरम्यान, मुंढवा परिसरातील महिला व बालविकास विभागाची 3.4 हेक्टर जागा तसेच कोरेगाव पार्कमधील वन विभागाची 11 हेक्टर जागाही या प्रकल्पात समाविष्ट केली जाणार आहे. या सर्व जागांचे भूसंपादन करण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल,’ असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
“नदीकाठ सुधार प्रकल्पातील एका टप्प्याचे काम पीपीपी तत्त्वावर सुरू आहे. मात्र आवश्यक जागांचे भूसंपादन न झाल्याने कामाला संथगती होती. लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून प्रकल्प गतिमान करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.”
- नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका