

Devendra Fadnavis on Rahul Gandhi
पुणे: ‘मतदार यादीची तपासणी करा,’ अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करीत आहेत. ही मागणी तर आम्ही पहिल्यापासूनच करीत होतो आणि त्यामुळेच आम्ही बिहार राज्यात मतदार यादीची पुनर्रचना करीत आहोत. राहुल गांधी यांची स्क्रिप्ट अतिशय मनोरंजक असून, राहुल गांधी यांना नक्की काय हवे आहे, हेच कळत नाही, अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत मतांची चोरी झाल्याची टीका केली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात पत्रकारांशी विचारले असता ते म्हणाले की, अलीकडच्या काळात राहुल गांधी यांनी सलीम-जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. (Latest Pune News)
ही स्क्रिप्ट अतिशय मनोरंजनात्मक आहे आणि तीच सगळीकडे म्हणत आहेत. पण त्यांच्याकडून मनोरंजनाच्या पलीकडे काहीच होत नाही. सगळ्या गोष्टी त्या कपोलकल्पित आहेत, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.
पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित विविध कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले असता पत्रकारांनी त्यांना गाठून बोलते केले. त्या वेळी त्यांनी ही टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी एकीकडे म्हणत आहेत की मतदार यादीत घोळ आहे. आम्हीपण आतापर्यंत तेच सांगत होतो. राहुल गांधी यांना केवळ आपल्या हरण्याचे काहीतरी कारण शोधायचे आहे. त्यामुळे ते तसे बोलत आहेत.
उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत स्थान
फडणवीस म्हणाले की, गुरुवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बसल्याचे दिसून आले. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत असत. तिथे त्यांचा काय मान सन्मान आहे, हे आता लक्षात आले आहे. भाषणात खूप म्हणायचे की दिल्लीसमोर मान झुकवणार नाही. दिल्लीसमोर पायघड्या टाकणार नाही. पण दिल्लीत काय परिस्थिती आहे, तेही सत्तेत नसताना हे पाहून खूप दुःख होत असल्याची टीका त्यांनी केली.