

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तूर्तास तिसर्या महापालिकेची गरज नाही. भविष्यात गरज पडल्यास तिची निर्मिती करू, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याला आणखी तीन महापालिकांची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना तिसर्या महापालिकेची तूर्तास गरज नसल्याचे सांगितले. पुणे महानगर क्षेत्राचे स्वतंत्र नियोजन पीएमआरडीएद्वारे करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Latest Pune News)
तीन महापालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत, अजून एक, अशा तीन करा, असे अजितदादांचे म्हणणे आहे. अजून तीन नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड, अशा दोन मनपा आहेत, अजून एक महापालिका करा, अशी चर्चा बर्याच दिवसांपासून आहे. आतातरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का? याचा विचार आपल्याला करावा लागेल. पण, भविष्यात ज्याप्रकारचे शहरीकरण पुण्यात होते आहे, त्यावरून भविष्यातकधीतरी आपल्याला हा विचार करावाच लागेल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले.
पुणे महापालिकेमध्ये 32 गावांचा समावेश करण्यात आल्याने महापालिकेचे क्षेत्र 510 चौ. कि.मी.पेक्षा अधिक झाले आणि पुणे महापालिका आकाराने मुंबईपेक्षा मोठी झाली. त्यामुळे एकाच महापालिकेला एवढ्या मोठ्या क्षेत्राचा कारभार सांभाळणे अवघड असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावर उपाय म्हणून हडपसर परिसरासाठी स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी पुढे आली. त्याला हडपसर परिसरातील अनेक राजकीय नेत्यांनी पाठिंबाही दिला. अनेकदा मंत्री पातळीवरही चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यापूर्वी या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पुणे महापालिकेचे विभाजन होण्याची शक्यता बळावली होती. तथापि, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज तिसरी महापालिका तूर्तास होणार नसल्याचे निःसंदिग्धपणे सांगितले आहे. त्यामुळे याबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाल्याचे मानले जाते.