

कामशेत : मावळ तालुक्यातील नाणे मावळ, अंदर मावळ, पवन मावळ या भागात पडत असलेली कडाक्याची थंडी रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरत आहे. थंडीमुळे पोषक वातावरण व जमिनीत असलेला ओलावा टिकून राहत असल्यामुळे रब्बी पिकांसाठी हे फायदेशीर व पोषक ठरत आहे. त्यामुळे रब्बी पिके तरलेली आहेत.
बहुतांश शेतकर्यांनी केली पेरणी
अवकाळी पावसाचा भरवसा नसल्याने मावळ भागात खरीप हंगाम लवकर आटपून रब्बीसाठी बहुतांशी शेतकर्यांनी पेरणी केलेली आहे. तसेच, काही ठिकाणी बहुतांशी पिकांची अर्धवट वाढ झालेली आहे. ज्वारी, हरभरा, मसूर व गावरान वाटाणा यासारख्या रब्बी पिकांसाठी सध्याचे वातावरण चांगले असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
बळीराजाला यंदा चांगले उत्पन्न मिळण्याची आशा
पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी बहुतांशी शेतकर्यांनी खरीप कामे तातडीने आटपून रब्बी हंगामाला सुरुवात केली आहे. लवकरात लवकर पेरणी करून जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेण्यासाठी शेतकर्यांनी रब्बी पिकासाठी लगबग सुरू केली आहे. यंदा रब्बी पिकातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा शेतकर्यांना आहे. रब्बी पिके ही शेतकर्याच्या फायदेशीर व उत्पन्न वाढीसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. असेच वातावरण भविष्यातही राहू दे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
रब्बी पिकांसाठी हा हंगाम चांगला आहे. थंडीचे वातावरण रब्बी पिकांसाठी पोषक आहे. या वातावरणात मसूर, हरभरा, वाल, गावरान वाटाणा इत्यादी पिके घेतले जातात. हवेतील गारवा यामुळे जमिनीत ओलावा असल्याने पिके जोर धरू लागली आहेत. असेच वातावरण राहिले तर रब्बी पिके चांगली येतील.
– दत्ता गरूड,
शेतकरी, टाकवे खुर्द