पुणे : बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरांत रांगा ; ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष

पुणे : बाप्पाच्या दर्शनासाठी मंदिरांत रांगा ; ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष…फुलांची आकर्षक सजावट अन् विद्युत रोषणाई….गणरायाच्या दर्शनासाठी झालेली गर्दी अन् मंदिरांत आयोजिलेले विविध धार्मिक कार्यक्रम…असे भक्तिमय वातावरण मंगळवारी अंगारकी चतुर्थीनिमित्ताने मंदिरांमध्ये होते. गणरायाचे दर्शन घेऊन भाविकांनी सुख-समृद्धी आणि चैतन्य नांदण्यासाठी प्रार्थना केली.  अंगारकी चतुर्थीनिमित्ताने मंदिरांमध्ये फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने मंदिरे झगमगली होती.

रांगोळीच्या पायघड्या अन् 'गणपती बाप्पा मोरया…','मंगलमूर्ती मोरया…','ओम् गं गणपतये नम:…' अशा श्रीगणेश नामाच्या जयघोषाने मंदिरे दुमदुमून गेली. मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रम झाले. श्री कसबा गणपती मंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी गणपती दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाने मंदिर उजळून निघाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेक झाला. यावेळी गायक जितेंद्र अभ्यंकर यांनी गायनसेवा केली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर श्रीगणेशयाग झाला. याशिवाय गणरायाची मंगलारती आदी कार्यक्रम झाले.

'विघ्नहरा'ला अलोट गर्दी

नारायणगाव : श्रीक्षेत्र ओझर येथे अंगारकी चतुर्थीच्या शुभमुहुर्तावर गणेश-लक्ष्मी-कुबेर यागाचे आयोजन केले होते. यागामध्ये एकूण पंचाहत्तर यजमान जोडप्यांचा सहभाग होता. यागाची सांगता महाआरतीने झाली.

श्री चिंतामणीला रांग
लोणी काळभोर : अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणीची पहाटे पाचला पुजारी मकरंद आगलावे यांनी पूजा केली. चिंचवड देवस्थानच्या वतीनेही महापूजा करण्यात आली. मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात रंगीबेरंगी फुलांची, फुग्यांची आरास केली होती.

श्री महागणपतीलाही तोबा गर्दी
शिरूर : रांजणगाव येथील श्रीमहागणपतीला मंगळवारी (दि. 10) अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. पहाटे अभिषेक तसेच दुपारी 12 वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

मयूरेश्वराची पूजा
मोरगाव : मोरगाव (ता. बारामती) येथील मयूरेश्वराच्या दर्शनाला अंगारकी चतुर्थनिमित्त भाविकांची गर्दी झाली. भाविकांनी चतुर्थीनिमित्त   ब्रह्मवृंदाकरवी अभिषेक घातला. मयूरेश्वराच्या धार्मिक परंपरेनुसार ब्रह्मवृंदाकरवी श्री मयूरेश्वराची पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.

गिरिजात्मजास सजावट
जुन्नर : अंगारकी चतुर्थीनिमित्त मंगळवारी (दि. 10) श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्रीगिरीजात्मज गणपतीस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. चालू वर्षातील प्रथम अंगारकी चतुर्थी असल्याने दिवसभरात हजारो भाविकांनी श्रीगिरीजात्मज गणेशाच्या दर्शनाचा लाभ घेतला. यानिमित्ताने लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news