विमानतळावरच प्रवाशांना क्वारंटाइन करा

विमानतळावरच प्रवाशांना क्वारंटाइन करा

महापौर उषा ढोरे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :
ओमायक्रॉनचा नवीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेशातून येणार्‍या सर्व नागरिकांना विमानतळ परिसरात शासकीय सूचना किंवा नियमानुसार काही दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात यावे.

त्यानुसार संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी विनंती महापौर उषा ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव वेगाने वाढत आहे. तसेच, पिंपरी-चिंचवडमध्ये ही ओमायक्रॉनचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात जगभरातून ये-जा करणार्‍या परदेशी व देशी प्रवाशांची संख्या मोठी आहे. परदेशातून येणारे प्रवासी नागरिक हे थेट पिंपरी चिंचवड शहरासह पुणे व आजूबाजूच्या परिसरात इच्छित स्थळी जात असताना त्यांचे वाहनचालक, सहप्रवासी, मॉलमधील कर्मचारी किंवा इतर ठिकाणच्या नागरिकांशी संपर्क येतो.

विषाणूचा प्रसार वेगाने होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढून संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व परदेशी नागरिकांचे विमानतळावर शासकीय सूचना किंवा नियमानुसार काही कालावधीसाठी त्यांना क्वारंटाइन करणे अत्यंत गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवडसह पुणे व आजूबाजूच्या परिसरातील प्रवासी नागरिक हे विमानतळाबाहेर नागरी किंवा इतर रहिवासी भागामध्ये जाण्यासंबंधी कडक निर्बंध घालून त्यांची वेळीच वैद्यकीय तपासणी केली जावी.

ओमायक्रॉन विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी, तसेच नवीन रुग्णांच्या वाढीस वेळीच आळा घालण्यासाठी परदेशातून येणार्‍या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी व विमानतळावर सक्तीचे क्वारंटाइन करण्याबाबत संबंधित यंत्रणेस सूचना व्हाव्यात, अशी विनंती महापौरांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news