पिंपरी : पालिका शाळांमध्ये गुणवत्तावृद्धी कार्यक्रम

शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
शाळांना मिळणार वाढीव टप्पा अनुदान
Published on
Updated on

दीपेश सुराणा :

पिंपरी : निपुण भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावृद्धी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जात आहे. 2 जानेवारी ते 25 फेब्रुवारी अशा 8 आठवड्यांच्या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत आकलन स्तर निश्चित केला जाणार आहे. कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अध्ययन र्‍हास झाल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर आले आहे. निपुण भारतअंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. 2026 पर्यंत इयत्ता तिसरीच्या 100 टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत वाचन व संख्या ज्ञानाची सर्व क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पूरक अशा कृती कार्यक्रमांची निश्चिती :

मुलांना इयत्तानिहाय निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार वाचन व लेखन क्षमता प्राप्त नसल्याचे शाळा भेटीतून दिसून येत आहे. निपुण भारत अभियानात उद्दिष्ट साध्य करणे तसेच मुलांचे वाचन, लेखन, गणन आदी कौशल्य विकसित व्हावीत, यासाठी निपुण भारत अभियानामध्ये पूरक अशा कृती कार्यक्रमाची निश्चिती केली आहे.

माता पालक गटांची निर्मिती :

मुलांमध्ये वाचन, लेखन कौशल्याचे विकसन करून अध्ययन र्‍हास भरून काढण्यासाठी शिक्षकांनी पालकांचे सहकार्य घ्यावे, यासाठी माता पालक गटांची निर्मिती करण्यात आली आहे. माता पालक गटांची स्थापना करून मुलांच्या अध्ययनामध्ये त्यांचा सहभाग घेण्यात येत आहे.

मुलांचे होणार मूल्यमापन :

प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील मुले भाषा व गणित विषयाच्या कोणत्या क्षमतेत मागे आहेत, हे निश्चित करावे. निपुण भारतमध्ये दिलेल्या उद्दिष्टांनुसार शाळेतील पहिली ते पाचवीमधील सर्व विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीनुसार विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे, याचे शिक्षकांनी अवलोकन करून तीन गटांमध्ये वर्गीकरण करायचे आहे. तसेच, दिवसनिहाय निपुण भारत गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमाची पुढील दोन महिन्यांसाठी अंमलबजावणी केली जाणार आहे. हा कार्यक्रम राबविल्यानंतर या कार्यक्रमाची परिणामकारकता तपासण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवीच्या 100 टक्के मूल्यमापन करण्यात येणार आहे.

गुणवत्तावृद्धी कार्यक्रम कसा राबविणार ?

इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी 8 आठवडे उपक्रम
(2 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2023)
विषय भाषा व गणित यांचे आकलन होणार (45 मिनिटे भाषा व 45 मिनिटे गणित)
प्रत्येक आठवडा संपल्यानंतर येणार्या प्रत्येक सोमवारी शिक्षकांकडून गेल्या आठवड्यातील कृतींवर आधारित विद्यार्थ्यांची उजळणी
उपक्रमाचा वेळ वगळून उर्वरित वेळेत नियमित अध्यापन सुरू राहणार
फेब्रुवारी 2023 मध्ये विद्यार्थ्यांचे इतर शिक्षकांकडून मूल्यमापन

कोरोना कालावधीत शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा झालेला अध्ययन र्‍हास भरून काढण्यासाठी निपुण भारत अभियानअंतर्गत महापालिका शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुलांचा आकलन स्तर निश्चित करून त्यांच्यामध्ये वाचन, लेखन आणि गणन कौशल्य विकसित केले जाणार आहे. तशा सूचना महापालिका प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत.
      -संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी,  प्राथमिक शिक्षण विभाग, महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news