वाहन परवान्यासाठी चीपऐवजी क्यूआर कोडचा होणार वापर

वाहन परवान्यासाठी चीपऐवजी क्यूआर कोडचा होणार वापर
Published on
Updated on

पिंपरी : परिवहन विभागाने पिंपरी-चिंचवडसह सर्वत्र वाहन नोंदणी प्रमाणपत्रासह वाहन परवान्यासाठी चीपऐवजी आता क्यूआर कोडचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, 1 ऑगस्टपासून कामकाज सुरू होणार होते. मात्र अद्यापही नागरिकांच्या हाती नव्या स्वरूपातील परवाना आला नाही. चीपच्या तुटवड्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांना वाहन परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्रासाठी (आरसी) प्रतीक्षा करावी लागत आहे.

यावर उपाय म्हणून परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी कर्नाटकमधील कंपनीशी करार केला. त्यामुळे 1 ऑगस्टपासून वाहनचालकांना नवीन स्वरूपातील परवाने मिळणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार, यामध्ये प्रथमच लेझर तंत्राचा वापर करून, स्मार्ट कार्ड बनविण्यात येणार होते. यासाठी कर्नाटक येथील 'एमसीटी कार्ड अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीसोबत करार करण्यात आला. ठरल्यानुसार एक तारीख उलटून गेली मात्र अद्यापही कामकाजाला सुरुवात झाली नाही. तसेच राज्यातील तीन ठिकाणीच प्रिंटींग होणार असल्याने आणखी विलंब लागणार या भीतीने काहींनी शहरातील आमदारांना निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत.

या तीन ठिकाणी होतील प्रिटींग
पूर्वी प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयात वाहन परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्रिंट केली जात होती. मात्र आता राज्यातील मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी प्रिंटीग होणार आहे.

आता मुहूर्त कधी?
परिवहन विभागाच्या वतीने नवीन आरसी व परवाना जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर एक ऑगस्ट ही तारीख देण्यात आली. मात्र, अद्यापही नागरिकांना जुन्याच प्रकारचे आरसी आणि वाहन परवाने दिले जात असल्याने आता पुढचा कुठला मुहूर्त कधी? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

पुणे केंद्रामध्येच प्रिंटींगची मागणी
शहरात नोंद होणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना तीन ते चार महिने परवाने आणि आरसीसाठी वाट पाहावी लागते. आणि नव्याने होणार्‍या छपाईसाठी औरंगाबाद केंद्रावर विसंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे आणखी उशीर लागणार असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. म्हणून प्रिंटींगसाठी पुणे केंद्र सुचविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

शहरात महिन्याला 50 ते 55 हजार वाहनांची नोंद होत आहे. या सर्व वाहनांचे परवाने आणि आरसी मिळण्यासाठी विलंब लागत आहे. आणि नव्याने प्रिंट होणारे परवाने औरंगाबादमधून मिळणार आहेत. त्यामुळे आणखी विलंब लागणार आहे. म्हणून पुण्यात छपाई केंद्र सुरू करावे; तसेच नव्या पध्दतीने परवाने तत्काळ नागरिकांच्या हाती देण्यात यावेत.
                                      – सुनिल बर्गे, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अध्यक्ष

नव्या पध्दतीचे परवाने लवकरच नागरिकांच्या हाती मिळणार आहेत. तसेच हे परवाने तीन केंद्रामधून मिळणार आहेत. प्रत्येक केंद्रामधून दिवसाला 15 हजार नव्या पध्दतीचे परवाने छापण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आता विलंब होणार नाही. नागरिकांना उत्तम आणि वेळेवर सेवा देण्यासाठी परिवहन विभाग कार्यरत आहे.
                                   – संजीव भोर, उपप्रादेशिक अधिकारी, पुणे

कार्ड रीडरअभावी चीप निष्क्रीय
परवाना आणि आरसी कार्डमध्ये लावण्यात येणार्‍या चीपमध्ये वाहनांची आणि परवानाधारकांची माहिती असायची. पण, स्मार्ट कार्ड सुरू झाल्यापासून आरटीओ कर्मचार्‍यांना कार्ड रीडर उपलब्ध झाले नाही, त्यामुळे चीपचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रशासनावर आता चीप काढून टाकण्याची नामुष्की ओढवली. नवीन आरसी व वाहन परवान्यावर आता चीपऐवजी क्यूआर कोड असणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news