खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला धरण तीरावरील आगळंबे परिसरातील पारगेवाडी येथे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास एक महाकाय अजगर आढळून आला. रानात चरणार्या एका शेळीचा फडशा या अजगराने पाडला. सर्पमित्रांच्या प्रसंगावधानतेने अजगराला पकडून जंगलातील अधिवास क्षेत्रात सोडण्यात आले. दरम्यान, या अजगराची प्रजात प्रामुख्याने दक्षिण आफि—केच्या जंगलात आढळून येत असल्याने तज्ज्ञांनी सांगितले.
पारगेवाडीच्या रानात एका शेळीला महाकाय अजगराने विळखा घालून तिचा फडशा पाडल्याची माहिती माजी उपसरपंच गणेश पारगे यांनी दिली. त्यानंतर कोंढवे धावडे येथील सर्पमित्र रमेश राठोड यांच्यासह रोहन गायकवाड, मंगेश धावडे, अक्षय धोंडगे, नवनाथ धावडे, ऋतुराज काळे, तसेच गणेश पारगे यांनी मोठ्या धाडसाने अजगराच्या विळख्यातून मृत शेळीला बाहेर काढले. त्यावेळी अजगराने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. राठोड, पारगे आदींनी अतिशय चपळाईने अजगराला अलगदपणे पकडले.
त्यानंतर त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे व कोंढवे-धावडेच्या माजी उपसरपंच स्नेहल धावडे यांनी धाडसी सर्पमित्र व युवकांचे कौतुक केले आहे. या महाकाय अजगराची लांबी तब्बल 15 फुटांपेक्षा अधिक असून, त्याचे वजन शंभर किलोहून अधिक आहे. सर्पमित्रांनी त्याला हातात घेतलेल्या अजगराचे वजन पेलवत नव्हते. हा अजगर दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात आढळून येत असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.