

Pustakwala Bhai Avinash Ingle Journey: आजच्या काळात माणसांमधील संवाद कमी होत चालला आहे. सोशल मीडियाच्या गोंगाटात विचार हरवतोय, संवेदना बोथट होत आहेत. अशा वातावरणात काही माणसं असतात, जी शांतपणे पण ठामपणे समाजाच्या हातात विवेकाचा दिवा देण्याचं काम करतात. ‘पुस्तकवाला भाई’ ही अशीच एक वाचन चळवळ आहे. हा प्रवास सुरू झाला तो केवळ पुस्तकविक्रीसाठी नव्हे, तर माणूस घडवण्यासाठी.
‘पुस्तकवाला भाई’ यांनी पुस्तकांकडे कधीच केवळ नफा-तोट्याच्या चष्म्यातून पाहिलं नाही. पुस्तक हे समाजाच्या बदलाचं साधन आहे, विचारांना दिशा देणारं माध्यम आहे, ही ठाम भूमिका सुरुवातीपासून होती. साहित्य संमेलनं, वैचारिक मेळावे, सामाजिक कार्यक्रमांमधून पुरोगामी विचारांची पुस्तके थेट वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू झालं.
शरद पाटील, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, नामदेव ढसाळ, इरावती कर्वे, डॉ. आ. ह. साळुंखे यांसारख्या विचारवंतांचं साहित्य केवळ कपाटात बंद राहू नये, तर तरुणाईपर्यंत पोहोचावं, हा ध्यास ‘पुस्तकवाला भाई’चा आहे. समता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा आणि माणूसपण यांची बीजं पेरणारी पुस्तके त्यांनी जाणीवपूर्वक पुढे आणली.
काळाची पावलं ओळखत ‘पुस्तकवाला भाई’ने डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज उत्तम पुस्तकांची माहिती, वैचारिक संदर्भ आणि वाचनाची गोडी लावणारा संवाद सुरू झाला. आज एक लाखांहून अधिक वाचक थेट या प्रवासाशी जोडले गेले आहेत.
ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती थांबली नाही. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि 35 हून अधिक देशांतील मराठी वाचकांपर्यंत ‘पुस्तकवाला भाई’ पोहोचला. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलेला मराठी माणूस विचारांची नाळ जपून ठेवू शकतो, याचा हा ठोस पुरावा आहे.
वाचकांच्या आवडीनिवडी, प्रश्न, सामाजिक जाणिवा लक्षात घेऊन दर्जेदार पुस्तकांची निवड हेच ‘पुस्तकवाला भाई’चं बळ आहे. लोकप्रियतेपेक्षा मूल्यांना प्राधान्य देण्याचा विचार या प्रवासात कायम आहे.
“वाचणारी पिढीच देशाला विवेक, मूल्ये आणि लोकशाहीची दिशा देऊ शकते” या विश्वासावर उभा असलेला ‘पुस्तकवाला भाई’चा सहा वर्षांचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही, तर विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या हजारो वाचकांचा आहे.
सहाव्या वर्धापन दिनानिमित्त, समाजात विवेकाची मशाल पेटवणाऱ्या या चळवळीला साथ देणाऱ्या प्रत्येक वाचकाचा, लेखकाचा हा प्रवास आहेआणि तो अजून बराच पुढे जाणार आहे.