

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्याचे (वर्ल्ड बुक फेअर) २०२६ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात मोठा पुस्तक मेळा असून, तो केवळ विचारांचे संगमस्थान नसून भारताच्या समृद्ध व सशक्त वाचनसंस्कृतीचा भव्य उत्सव आहे.
यंदाच्या पुस्तक मेळ्याची “भारतीय लष्करी इतिहास: शौर्य आणि बुद्धिमत्ता @ 75” ही संकल्पना तसेच कतार आणि स्पेनसारख्या देशांचा सहभाग यामुळे या सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हा मेळा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा १० ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होत असून, प्रथमच या पुस्तक मेळ्यात प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या पुस्तक मेळ्यात ३५ पेक्षा जास्त देशांतील १ हजारपेक्षा जास्त प्रकाशक सहभागी होत असून, १ हजारपेक्षा अधिक वक्त्यांसह ६०० पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या भव्य साहित्यिक महोत्सवाला २० लाखापेक्षा जास्त वाचक व अभ्यागत उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या उद्घाटन समारंभाला कतारचे सांस्कृतिक कार्य मंत्री अब्दुलरहमान बिन हमद बिन जसीम बिन अल थानी, स्पेनचे सांस्कृतिक कार्य मंत्री अर्नेस्ट उर्तासुन डोमेनेच, स्पेनच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयातील पुस्तक विभागाच्या महासंचालिका मारिया होसे गाल्व्हेझ, उच्च शिक्षण सचिव डॉ. विनीत जोशी, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद सुधाकर मराठे, एनबीटीचे संचालक युवराज मलिक यांच्यासह कतार व स्पेनमधील मान्यवर प्रतिनिधी आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.