पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : थोरांदळे येथील श्री हनुमान जन्मोत्सव गुरुवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात पार पडला. या जन्मोत्सवाला पंचक्रोशीतील हजारो भाविक – भक्त उपस्थित होते. थोरांदळ्यात हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरी केला जातो.
यंदा हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच ते सात या वेळेत हभप नंदू महाराज सोनवणे (रांजणी) यांचे हनुमान जन्माचे व काल्याचे कीर्तन झाले. या वेळी भाविक-भक्तांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या शेजारून जाणार्या बेल्हा ते मंचर रस्त्यावर लहान- मोठ्या वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
गुरुवारी सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी भाविक-भक्तांनी फुलांचा वर्षाव केला. सरपंच जे. डी. टेमगिरे व श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्रीराम टेमगिरे यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित भाविकांना 'पुरी – गुळवणीच्या ' महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी आस्वाद घेतला.