पुरंदर उपसाला मिळणार नवसंजीवनी

पुरंदर उपसाला मिळणार नवसंजीवनी
Published on
Updated on

नायगाव : पुढारी वृत्तसेवा :  पुरंदर, बारामती, दौंड आणि हवेली तालुक्यातील कृषी क्षेत्राला संजीवनी देणार्‍या पुरंदर उपसा सिंचन योजनेला लागलेली घरघर सावरण्यासाठी अखेरीस माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पावले उचलली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या योजनेचे पंप नादुरुस्त असल्याने वारंवार योजना बंद पडत आहे. या पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी कृष्णा खोरे महामंडळाला याबाबतचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लवकरच या निधीला तांत्रिक मंजुरी मिळणार असल्याचे सूतोवाच शिवतारे यांनी प्रसिध्दिपत्रकाद्वारे केले आहे.

मागील आठवड्यात शिवतारे आणि आमदार जगताप यांच्यात या योजनेवरून जुगलबंदी झाली होती. काँग्रेसच्या एका पदाधिकार्‍याची या योजनेवर स्व:घोषित नियुक्ती करून आमदारांनी या योजनेचा बट्ट्याबोळ करून टाकल्याची टीका शिवतारे यांनी केली होती. याबाबत शिवतारे म्हणाले, पुरंदर उपसा योजनेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश जगताप, गंगाराम जगदाळे यांनीही याबाबत वेळोवेळी आवाज उठवला. पण आमदारांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. पाणी तलावात पोचायच्या आत योजनेचे पंप बिघडत आहेत. पण त्यासाठी निधी मिळविण्याकडे आमदारांचे लक्ष नसून केवळ शेतकर्‍यांची लूट सुरू आहे. महाविकास आघाडीच्या काळात योजनेची पाणीपट्टी बेसुमार वाढवून ठेवली होती, पण तिथेही आमदारांनी मौन धारण केले होते.

दरम्यान, सुदैवाने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ही पाणीपट्टी कमी करण्यात मला यश आले. सध्या पंपगृह क्र. 1 ते 6 मधील पंपदुरुस्ती करणे, गळती प्रतिबंधक व गंजरोधक कामे, सीसीटीव्ही बसवणे, संरक्षण भिंत बांधणे, विद्युतीकरण व यांत्रिकी स्वरूपाच्या कामांना 55 कोटींची मागणी महामंडळामार्फत आम्ही केलेली आहे. शासनाने तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समिती नाशिक येथे हा प्रस्ताव पाठवला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यासाठी सहकार्य केल्याचेदेखील शिवतारे यांनी सांगितले.

आमदारांनी पूर्ण केलेले आश्वासन सांगावे
सन 2019 मध्ये निवडणुकीत मतदारांना स्व:खर्चाने गुंजवणीचे पाणी देणार, नव्या जागेत विमानतळ करणार, कर्‍हा नदीला संरक्षण भिंत बांधणार, हवेलीकरांचा टॅक्स कमी करणार, नोकर्‍या देणार, फुरसुंगी-उरुळी पाणी योजना पूर्ण करणार, अशी असंख्य आश्वासने आमदारांनी दिली होती. पण निवडणूक झाल्यावर आमदार केवळ बाहुला असल्याचे लोकांच्या लक्षात आले असून, पुरंदर-हवेली मतदारसंघ विकासाला मुकला असल्याची टीका शिवतारे यांनी केली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news