सासवड : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी अधिकृत घोषणा करत राज्यभर खळबळ उडवून दिली आहे. पुरंदर तालुक्यातून प्रथमच पवारांच्या विरोधात दंड थोपटले जाणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीच्या पवार कुटुंबाचे असलेले वर्चस्व पाहता इतर सर्व तालुक्यांनी खासदारकीचे स्वप्न जवळपास गुंडाळून ठेवले होते. पण, विजय शिवतारे यांच्या चालीने पवार कुटुंबाबाहेरील व्यक्ती देखील यंदा खासदार होऊ शकते, अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे.
1984 पासून पवार कुटुंबातील व्यक्तीच या मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व करीत आहे. जिल्ह्यात आपल्याव्यतिरिक्त अन्य सत्ताकेंद्र निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत पवार काका- पुतण्यांनी अनेक मातब्बर राजकीय घराण्यांना आपल्या डावपेचातून नामोहरम केले. याची सुरुवात झाली ती बारामती तालुक्यातील काकडे घराण्याच्या राजकीय पतनातून, मग दौंड तालुक्यात दिवंगत सुभाष कुल यांनाही पवारांशी दोनहात करावे लागले. भोर तालुक्यात अनंतराव थोपटे यांचे प्राबल्य होते. त्यांना 1999 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आलेली असताना शरद पवार यांनी खुटवड यांच्याकडून अनंतराव थोपटे यांचा पराभव घडवून आणला आणि थोपटे यांची मुख्यमंत्री होण्याची संधी गेली.
2004 साली पवारांनी डाव टाकला तो मातब्बर दादा जाधवराव यांच्यावर 2004 साली लोकसभा निवडणुकीला त्यांची मदत घेतली आणि अवघ्या चार महिन्यांनी आलेल्या विधानसभेला त्यांना 'बैल म्हातारा' झाल्याचे सांगत 'बाजार दाखवा' असे सांगत त्यांचा पराभव केला. त्या पराभवातून जाधवराव घराणे कधी सावरलेच नाही. जाधवराव यांच्यानंतर नंबर लागला तो याच तालुक्यातील दिवंगत चंदूकाका जगताप यांचा. चंदूकाका जगताप यांना विधानपरिषदेची उमेदवारी देत अजित पवारांनी लक्ष्मण जगताप या बंडखोर उमेदवाराला निवडून आणले.
चंदूकाकांचा आघाडीचे बहुमत असूनही अत्यंत लाजिरवाणा आणि दारुण पराभव झाला. पाठोपाठ इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील यांचा काटा काढण्यात पवारांनी यश मिळवले. हर्षवर्धन पाटील हे दर लोकसभेला इमानेइतबारे पवारांची सेवा करीत राहिले पण जवळपास चार विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना चकवा देण्याचा प्रयत्न झाला. त्यात 2014 आणि 2019 अशा सलग दोन वेळा त्यांना पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. यंदा हर्षवर्धन पुन्हा पवारांच्या भूलभुलैयाला बळी पडतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा