

सासवड: पुरंदर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या 10 दिवसांपासून सकाळच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि सतत धुके पडल्याने नव्या लागवडीवरील कांदा रोपे तसेच बीज उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी ’मर’ रोगाचा प्रादुर्भाव वाढून पिकाचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बदलत्या हवामानाचा फटका कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. कांद्यावर भुरी, जांभळा करपा आणि पीळ या रोगांचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक भागांमध्ये कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांतील अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानामुळे कांद्याची वाढ खुंटली असून, पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही घटत आहे.
लागवडीनंतर केवळ 10 ते 15 दिवसांतच कांदा रोपे पिवळी पडणे, वाकडी होणे व पीळ दिसू लागण्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. काही ठिकाणी करपा रोगाचा तीव प्रादुर्भाव जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी केलेला मोठा खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
’गराडे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रोपे, मजुरी, नांगरणी आणि इतर प्रक्रियांवर प्रतिएकर 30 ते 35 हजार रुपये खर्च केला. परंतु, धुक्यामुळे रोपे मरत असल्याने संपूर्ण खर्च धोक्यात आला आहे,’ अशी भावना कांदा उत्पादक किरण तरडे यांनी व्यक्त केली. पुरंदर तालुक्यात यंदा चांगला पाऊस व पाण्याची उपलब्धता असल्याने तब्बल 2,915 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील कांदा लागवड झाली आहे. कांदा
पिकावरील बुरशीजन्य ’करपा’ रोग नियंत्रणासाठी डायकाफेनाझोल 25 टक्के 10 मिली किंवा टेबुकोनाझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिला आहे.