

पुणे: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेने आता निर्णायक वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण १,२१६ हेक्टर क्षेत्रापैकी ७३५.२५ हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांची संमती मिळाली असून, हे प्रमाण ६०.४६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळासाठी प्रस्तावित सात गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमीन देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. वनपुरी गावातील २६५ शेतकऱ्यांनी ११८.४५ हेक्टर क्षेत्रासाठी संमती दिली आहे. उदाची वाडीतील ५९ शेतकऱ्यांनी ४२ हेक्टर, तर कुंभारवळण गावातील २५० शेतकऱ्यांनी ११२ हेक्टर क्षेत्र देण्यास होकार दर्शविला आहे.
पारगावमध्ये सर्वाधिक ५८० शेतकऱ्यांनी १००.४२ हेक्टर क्षेत्रासाठी संमती दिली आहे. एकतपूर येथे २९८ शेतकऱ्यांनी १४६.५० हेक्टर, खानवडीतील २६० शेतकऱ्यांनी १५०.८८ हेक्टर आणि मुंजवडीतील १७५ शेतकऱ्यांनी ६५ हेक्टर क्षेत्र देण्यास तयारी दर्शविली आहे. या आकडेवारीमुळे भूसंपादन प्रक्रियेत अपेक्षित प्रगती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी हा प्रकल्प विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विमानतळ उभारणीमुळे औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, वाहतूक सुविधा आणि व्यावसायिक संधींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भूसंपादनाचा टप्पा वेगाने पूर्ण झाल्यास विमानतळाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामालाही लवकर सुरुवात होऊ शकते. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या प्रकल्पाकडे आता शेतकरी, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सुधारित मोबदला पॅकेजनंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुधारित मोबदला पॅकेजनंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षणीय वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्या संमतिपत्रे, सातबारा उतारे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, त्यानंतर अंतिम भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून संबंधित गावांमध्ये सातत्याने बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही केले जात आहे.