

ठळक मुद्दे
संमतीपत्र सादर केलेल्या शेतकऱ्यांनाच भूखंडाचे वाटप केले जाणार
सहकार्यात पुढाकार घेणाऱ्यांना योग्य ती जागा मिळेल
विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ चारपट मोबदला; मात्र विकसित भूखंड नाही
Purandar Airport Land Acquisition Latest Update
पुणे : पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रियेत प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सहमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना 'एरोसिटी' मध्ये विकसित भूखंड 'प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य' तत्त्वानुसार मिळणार आहेत. यासोबतच १० टक्के विकसित भूखंड आणि बाजारभावाच्या चौपट रकमेचा मोबदला दिला जाणार आहे.
विमानतळाच्या परिसरातील ७०० एकर जमीन एरोसिटीसाठी विकसित भूखंड वाटपासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. संमतीपत्र देणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या एकूण जमिनीच्या १० टक्के क्षेत्रफळाच्या विकसित भूखंडाचे वितरण आणि जमिनीच्या सध्याच्या बाजारभावाच्या चारपट आर्थिक मोबदला मिळेल. 'प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर लवकर संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मोक्याच्या भूखंडांचा लाभमिळेल. संमतीपत्र घेण्याची प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. एकूण २,६७३ हेक्टर जमीन सात गावांमधून संपादित करण्यात येणार असून, यासाठी औद्योगिक विभागाकडून ३,५०० कोटी रुपयांची तरतूद सुचवली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनात हरकती नोंदविल्या आहेत. काही गावांनी एकरमागे १० कोटी, विकसित भूखंड आणि पाच एफएसआय यांसारख्या अटी मांडल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नोंदणी विभागास सर्व व्यवहार थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.
survey साठी अधिसूचना जारी केली असून, प्रॉपर्टी व्यवहारांवर तात्पुरती बंदी लागू आहे. प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामसभा, पंचायतींच्या माध्यमातून चर्चा होत आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे लवकर सहमती देणाऱ्यांना भरघोस लाभमिळणार असून, भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे. प्रस्तावित विमानतळामुळे पुणे जिल्ह्यातील पायाभूत विकासाला नवे वळण मिळेल, असा विश्वास संबंधित प्रशासनाने व्यक्त केला आहे.