बारामती : शहरातील जळोची येथे राहणाऱ्या एका तरूणाचा अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण खून केला. बुधवारी (दि.२१) रात्री आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जळोची जवळ असलेल्या काळा ओढा परिसरामध्ये ही घटना घडली असून गणेश वाघमोडे असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
बारामती तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, उप अधिक्षक तसेच पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. मृत गणेश वाघमोडे याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जात आहे. गणेश वाघमोडे अल्पवयीन असतानाच त्याने एकाचा खून केल्याने तो चर्चेत होता. आता त्याचाच खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.