Pune : डीएलपीतील रस्त्याची माहिती संकेतस्थळावर..!

Pune : डीएलपीतील रस्त्याची माहिती संकेतस्थळावर..!
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीतील दोष दायित्व (डीएलपी पिरियड) कालावधीतील रस्त्याची संपूर्ण माहिती संकेतस्थळावर टाकण्याची घोषणा करून तीन वर्षे झाल्यानंतर पथ विभागाला पुन्हा एकदा आपल्या घोषणेची आठवण झाली आहे. रस्त्याचे काम कधी झाले, खर्च किती झाला, ठेकेदार कोण, आणि रस्त्याचा डीएलपी पिरियड किती, याची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. शहरात 16 हजार कि.मी.चे रस्त्यांचे जाळे आहे. याच रस्त्यांखालून पावसाळी, ड्रेनेज, पाण्याच्या लाइन्स, वीज, टेलिफोन आणि केबलचे जाळे पसरले आहे. या सर्व अत्यावश्यक सेवा असल्याने बिघाड झाल्यास रस्त्यांची खोदाई करण्यात येते. या खड्ड्यांची दुरुस्ती व्यवस्थित होत नाही, त्यामुळे खोदाईच्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडतात.

सहा वर्षांपूर्वी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेसाठी रस्तेखोदाईला परवानगी दिली. आत्तापर्यंत या योजनेच्या पाइपलाइनसाठी जवळपास 900 कि.मी.चे रस्ते खोदण्यात आले आहेत. मध्यवर्ती शहरात पाण्याच्या लाइनसोबतच जुन्या ड्रेनेज लाइन बदलण्यासाठीही खोदाई करण्यात आली. या दोन्ही कामांमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारांकडे होती. दुसरीकडे डीएलपीतील रस्त्यांवरही खड्डे पडल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले होते.

परंतु, यामध्येही काही ठेकेदारांनी महापालिकेने अत्यावश्यक कामांसाठी अन्य विभागांच्या वतीने खोदाई करण्यात आल्याने डीएलपीमधील रस्त्यांना खड्डे पडल्याचे निदर्शनास आणून देत प्रशासनातील समन्वयाचा अभाव उघडकीस आणला होता. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व रस्त्यांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी केली होती. मात्र, तीन वर्षे काहीच झाले नाही. त्यानंतर आता माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार असल्याचे पथ विभागाकडून सांगण्यात येत आहे.
प्रशासनाच्या घोषणाच, कृती नाही

प्रशासकराजमध्ये गतवर्षी शहरातील सुमारे 100 कि.मी.चे रस्ते तयार करण्यासाठी पाच पॅकेजमध्ये निविदा काढण्यात आल्या. या पॅकेजनुसार कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच, तीन वर्षांत पथ विभाग, तसेच क्षेत्रीय कार्यालयांकडून देखील रस्त्यांची कामे करण्यात आली. स्मार्ट सिटीने देखील औंध, बाणेर, बालेवाडी परिसरातील रस्त्यांची कामे केली असून, कॅश क्रेडिट बाँच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर देखील सुमारे 400 कोटी रुपयांची रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यांपैकी एकाही कामाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही. त्यामुळे डीएलपीमधील रस्त्यांची कामेही पुन्हा करून उधळपट्टी केली जाते, अशी नागरिकांकडून टीका झाल्यानंतर प्रशासन तात्पुरत्या घोषणा करते, प्रत्यक्षात कृती करत नाही, असा आरोप नागरिक करू लागले आहेत.

रस्त्याचे काम यापूर्वी कधी करण्यात आले, ठेकेदार कोण, खर्च किती झाला, डीएलपी कधीपर्यंत आहे, याची माहिती फीड केलेली आहे. डीएलपीतील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम हे संबंधित ठेकेदारांकडूनच करून घेण्यात येते. कुठलेही काम दुबार होणार नाही. नागरिकांच्या माहितीसाठी लवकरच हा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

– अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता, पथ विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news