पुणे जिल्ह्यातील पुरातन वाडे, गढ्यांचे सर्वेक्षण; जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे जिल्ह्यातील पुरातन वाडे, गढ्यांचे सर्वेक्षण; जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात अनेक पुरातन वाडे, गढ्या आणि मंदिरे आहेत. त्यांचे ऐतिहासिक महत्त्वदेखील आहे. याच पुरातन वाडे, गढ्या आणि मंदिरांचे सर्वेक्षण करून अहवाल करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेने दिले आहेत. या सर्वेक्षणाद्वारे ग्रामीण भागातील इमारतींची स्थिती तपासून त्यांचे संवर्धन करणे आणि पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

काळाच्या ओघात झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणामुळे ऐतिहासिक, पुरातन वाडा संस्कृती संपुष्टात येत आहे. अनेक वारसाप्रेमी अवशेषांचे जतन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे प्रयत्न कमी पडत आहेत. ऐतिहासिक वाड्यांबरोबरच गेल्या अनेक वर्षांमध्ये गावातील पुरातन मंदिरे पाडून त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटची भव्य मंदिरे उभारण्यात आली. त्यामुळे मंदिरांच्या ऐतिहासिक वास्तूशास्त्राची संस्कृती लोप पावत आहे. या मंदिर आणि ग्रामीण वास्तूंच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाने ऐतिहासिक आणि खासगी पुरातन गढ्या, वाडेसंवर्धन प्रोत्साहन योजना राबवण्याची गरज आहे. याबाबत सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने जिल्हा परिषदेला निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून पुरातन वाडे, गढ्या आणि मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक आणि खासगी पुरातन गढ्या, वाडे, मंदिरांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच या सर्वेक्षणाद्वारे जुन्या इमारतीची तपासणी आणि पावसाळ्याची तयारीही होईल. अतिवृष्टी होऊनही आपत्ती टाळण्याचे प्रभावी व्यवस्थापन पुणे जिल्ह्याने केले आहे. त्यामुळे भिंती पडण्याचा धोका कमी झाल्याची खात्री या सर्वेक्षणामुळे होईल.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news