

वाघोली: दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) सुनीता गहलोत यांनी गुरुवारी (दि.9 एप्रिल) रात्री उशिरा येरवडा मनोरुग्णालयाची अचानक पाहणी केली. या पाहणीत रुग्णालयातील अत्यंत निष्काळजी व अस्वच्छ स्थिती उघडकीस आली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव नाराजी व्यक्त केली.
पाहणीदरम्यान रुग्णांच्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात डास आढळून आले. तसेच, अनेक रुग्ण पांघरुण नसताना थेट जमिनीवर झोपलेले दिसून आले. वॉर्डमध्ये अस्वच्छता आणि उग््रा वास पसरलेला असल्याने रुग्णांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त संचालक सुनीता गहलोत यांनी रुग्णांप्रति संवेदनशीलता ठेवून काम करण्याच्या सूचना रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, उपअधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, रुग्णालयातील एकूणच कारभाराची सखोल चौकशी उपसंचालकांमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या घटनेमुळे येरवडा मनोरुग्णालयातील व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुन्या बिटिशकालीन वस्तू भंगारात का काढण्यात आल्या, याबाबतही प्रशासनाला जाब विचारण्यात आला. दरम्यान, अतिरिक्त संचालक (मानसिक आरोग्य) सुनीता गहलोत यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल, असे स्पष्ट करत संपूर्ण बाबीची सखोल चौकशी करण्यात येईल, असे डॉ. कोलोड यांनी सांगितले.
ठेकेदाराला पुन्हा संधी देण्याबाबत सवालांची सरबत्ती
येरवडा मनोरुग्णालयातील पाहणीदरम्यान 19 लाख रुपयांच्या रुग्णांच्या अंडरगारमेंट घोटाळ्याचा ठपका असलेल्या ठेकेदाराला पुन्हा ठेका देण्यात आल्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. यावरून अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांना पत्रकारांनी धारेवर धरले. ‘हा घोटाळा आपल्या कार्यकाळात झाला होता का? नसेल तर त्यावेळी आपण उपअधीक्षक होतात, आता अधीक्षक आहात. टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली होती का? त्यात कोण कोण सहभागी झाले होते? ठपका असलेल्या ठेकेदारालाच पुन्हा संधी का देण्यात आली?’ अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.