Ajit Pawar
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील वाहतूक कोंडीची पाहणी करताना एका महिलेने 'मनोहर पर्रिकर जसे फिरायचे तसे तुम्ही पण फिरा' असे आव्हान दिले. पर्रीकरांच नाव घेतल्यावर अजित पवारांनी त्या महिलेला पर्रीकर कोण? असा प्रश्न केला. यावर महिलेने गोव्याचे मुख्यमंत्री असं उत्तर दिलं. एवढ्यावरच न थांबता ट्रॅफिक पाहायला वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल, असं म्हणत महिलेने थेट अजित पवारांना आव्हान दिलं.
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (दि. १४) पहाटे केशवनगर मुंढवा येथे नव्याने तयार होत असलेल्या पुलाची पाहणी केली व कामाच्या गुणवत्तेबाबत माहिती घेत, त्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच कोंढवा येथे कोंढवा चौकातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत व हडपसर येथे गाडीतळ चौकातील सुनियोजित वाहतुकीबाबत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत, परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित पवार यांच्यासमोर मांडल्या. वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या एका महिलेने थेट अजित पवारांना सुनावले. तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही उत्तरं सांगणार हे गरजेचं नाही. आम्ही कंटाळलोय याला. इथे राहायचं का नाही? असा प्रश्नच तिने केला. ट्रॅफिक संदर्भात तुम्हाला माहिती नाही असं होऊ शकत नाही. तुम्ही पण कधीतरी माहिती न देता फिरा. किंवा वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल, असा सल्ला महिलेने अजित पावारांना दिला.
महिलेने सल्ला देताच अजित पवार म्हणाले की, "मी एकटा फिरेन पण, मला मीडियाने फिरू दिलं पाहिजे." त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली, अधिकारी, लोकप्रतिनिधी सोबत सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. काही ठिकाणी राजकीय लोक आडकाठी आणत आहेत, असं समोर आले आहे. सरकारी कामात अडथळा म्हणून त्यांना सांगा नाही तर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पुढे ते म्हणाले, वाहतूक प्रश्न माहिती असणारे, लायकी असणारे अधिकारी पाहिजेत. मी आज लोकांशी जाऊन भेटणार आहे, आम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे, अनेक प्रश्न जाणून घेत आहोत. आम्ही तात्पुरतं काम करणार नाही, त्यापेक्षा पुणेकरांची 50-60 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील मेट्रो, वाहतूक समस्या या सगळ्याचा विचार करून पुढे काम करत असल्याचे पवारांनी सांगितलं.