

निनाद देशमुख
पुणे: जलसंपदा विभागामार्फत पुण्याला 14 टीएमसी पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात पुण्याला 21 टीएमसी पाणी पुरवले जाते. या पाणी वापरावरून ओरड सुरू असून, पाणी वापराबाबत पुणेकरांना शिस्त लागावी, यासाठी गळती कमी करून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी दिल्या होत्या. यासाठी समान पाणीपुरवठा योजना राबवली जात असून, ही योजना पूर्ण झाल्यावरही शहराची पाण्याची मागणी ही वाढतीच राहणार आहे.
शहराचे वेगाने होणारे नागरीकरण आणि समाविष्ट गावांमुळे ही मागणी आणखी वाढणार आहे. सध्या पुण्याला रोज 1700 एमएलडी पाण्याचा पुरवठा करण्यात येतो, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. पुणे महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुर्नवापर केला जात नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. गळतीदेखील खूप होत आहे. (Latest Pune News)
पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी जलसंपदा विभाग व महापालिकेचे अधिकारी मिळून टास्क फोर्स स्थापन करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या होत्या. त्या पूर्वी महापालिकेमार्फत पाण्याचा अपव्यय व गळती रोखण्यासाठी समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून, ही योजना पूर्ण होण्यासाठी आणखी 12 ते 14 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
या योजनेमुळे पाणी गळती 20 टक्क्यांवर येणार आहे. या योजनेची भांडवली स्वरूपाची कामे पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षे देखभाल दुरुस्ती कालावधी आहे. देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने गळती कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, 40 टक्के गळती कमी करून ती 20 टक्क्यांच्या आत आणण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. या योजनेमुळे वार्षिक साधारण 3 ते 4 टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. मात्र, ही पाणी बचत झाल्यावरही पाण्याची मागणी ही वाढतीच राहणार आहे.
पुणे शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 80.98 लाख (तरंगती लोकसंख्या विचारात घेऊन) इतकी आहे. सदर लोकसंख्येकरिता सध्या सुमारे 1700 एमएलडी पाणी लागतं. पुणे महापालिका क्षेत्रात नव्याने 34 गावांचा समावेश झाला आहे. तसेच नागरीकरण वेगाने होत आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून तसेच देशभरातील वेगवेगळ्या राज्यांतून नोकरी, व्यवसाय, रोजगारानिमित्त पुण्यात नागरिक मोठ्या संख्येने स्थायिक होत आहे.
त्यामुळे पायाभूत सुविधांबरोबरच मुख्यत: पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, जलसंपदा विभागाकडे अतिरिक्त पाणी देण्याची मागणी पुणे महापालिका गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहे. भविष्यातदेखील पुण्याचा विस्तार वाढणार असल्याने गळती रोखूनही पाण्याची मागणी ही वाढती राहणार असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रतिव्यक्ती 135 ते 150 लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन
पुणे शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 80.98 लाख (तरंगती लोकसंख्या विचारात घेऊन) इतकी आहे. सदर लोकसंख्येकरिता सध्या सुमारे दररोज सरासरी 1700 एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रत्येक नागरिकांला 135 ते 150 लीटर पाणीपुरवठा असे नियोजन महानगरपालिकेचे आहे. मात्र, या पेक्षा जास्त पाण्याचा वापर नागरिकांकडून केला जातो.
‘सीपीएचईईओ’नुसार पुण्याचा पाणीवापर अधिक
पुण्याला 1700 एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. सेंट्रल पब्लिक हेल्थ अँड एनव्हारमेंट इंजिनियरिंग ऑर्गनायझेशनच्या मानांकनानुसार हा पाणी वापर अधिक आहे. पाणी वापरताना योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नाही. पाण्याचा कसाही वापर केला जात असल्याने पाण्याची बचत होण्याएवजी गळती जादा आहे.
600 ते 650 एमएलडी पाण्याची गळती
शहरातील सुमारे 35 ते 40 टक्के गळती अभाजीय जल म्हणजे जलवितरण व्यवस्थेतून ग्राहकांपर्यंत पोहोचणारे, परंतु त्यासाठी नगरपालिका / जलप्राधिकरणास पैसे मिळत नाहीत. यात गळतीमुळे वाया जाणारे पाणी (लिकेजेस), बिनधास्त वापर (चोरीचे पाणी), अनधिकृत नळजोडणी, मीटर न बसवलेले किंवा चुकीचे मोजमाप प्रशासकीय वापरासाठी दिलेले पाणी, ज्याचे बिल होत नाही यांचा समावेश होतो. या कारणांमुळे 600 ते 650 एमएलडी पाण्याची गळती होत असल्याची धक्कादायक माहिती आहे.
समान पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल. त्यामुळे अतिरिक्त पाणी मागणी टाळता येईल, ही योजना पूर्ण झाल्यानंतर पाण्याची गळती ही 35 ते 40टक्यांवरून 20 टक्यांच्या आत येणार आहे. त्यामुळे दरदिवशी सुमारे साडेतीनशे दशलक्ष लिटर पाण्याची बचत होणार आहे.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख पाणीपुरवठा विभाग, मनपा