Alandi Wari Flood Update : आळंदीत वीज-पाण्याअभावी वारकऱ्यांचे हाल, गाळ आणि चिखलामुळे भाविकांची गैरसोय

पूर परिस्थितीत सोयी-सुविधा देताना प्रशासनाची कसरत
Wari Alandi Indrayani River Flood Update Pune Heavy Rain
आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी जागा भेटेल तिथे आश्रय घेत मुक्काम ठोकला आहे मात्र पाणी व विजेअभावी त्यांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे.
Published on
Updated on

आळंदी : आळंदी शहरात इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने आळंदी आणि खेड परिसराचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्याने आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, सोहळ्यासाठी आलेल्या वारकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक दिंडी प्रमुखांवर विकतचे पाणी आणून वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे, पूर ओसरलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर गाळ आणि चिखल साठल्याने तंबूंमध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातच मुसळधार पाऊस सुरूच असल्याने वारकरी कमालीचे मेटाकुटीला आले आहेत.

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदी नगरपरिषदेचा मुख्य पाणी उपसा पंप पाण्याखाली गेला आहे, तसेच नदीवरील मुख्य जलवाहिनी वाहून गेल्यामुळे आळंदी आणि हवेली भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आळंदी नगरपरिषद प्रशासनाने तातडीची विशेष बैठक घेतली असून युद्धपातळीवर कामे हाती घेतली आहेत.

Wari Alandi Indrayani River Flood Update Pune Heavy Rain
Alandi Indrayani River Flood Update : आळंदीत इंद्रायणी नदीवरील पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात; पाऊस सुरूच असल्याने चिंता कायम

विद्युत पुरवठा खंडित असल्याने सध्या डिझेल जनरेटरच्या साहाय्याने पंप सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. सद्यस्थितीत चाकण नगरपरिषदेची एक टीम आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) दोन टीम बचाव कार्यात कार्यरत आहेत. पुरातून सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या नागरिक व भाविकांसाठी तात्पुरता निवास, पिण्याचे पाणी आणि मोबाईल शौचालयांची व्यवस्था केली जात आहे. तसेच मुख्य प्रदक्षिणा मार्ग आणि माऊलींचा मंदिर परिसर जनरेटरच्या माध्यमातून प्रकाशमान ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुराच्या पाण्यामुळे शहरात साप निघण्याची शक्यता लक्षात घेऊन स्वतंत्र सर्पमित्रांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे व मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.

Wari Alandi Indrayani River Flood Update Pune Heavy Rain
Alandi Palkhi: आळंदीत पूरस्थिती; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात मोठा बदल, भाविकांना न येण्याचे आवाहन

प्रशासनाचे आवाहन तरीही आळंदीत वारकऱ्यांची गर्दी

महापुराची गंभीर परिस्थिती पाहता, यंदा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी आळंदीत न येता थेट पुण्यात पालखी सोहळ्यात सामील व्हावे, असे आवाहन आळंदी देवस्थान, नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाने केले होते. पुण्याकडून आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांना थोपवण्यात प्रशासनाला यश आले असले, तरी नाशिक, अहमदनगर आणि बीडच्या बाजूने येणारी वाहने चाकण व मरकळ मार्गे आळंदीत दाखल झाली आहेत. त्यामुळे आळंदीत पोहोचलेल्या हजारो वारकऱ्यांना या पूर परिस्थितीत सोयी-सुविधा पुरवताना प्रशासनाची मात्र कमालीची तारेवरची कसरत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news